देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायणमूर्ती यांचं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया उमटत आपली मतं मांडली जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या विधानावर नाराजी जाहीर केली आहे. यादरम्यान प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास यानेही यावर टीका करत टोला लगावला आहे. 


नारायणमूर्ती काय म्हणाले आहेत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"देशाला प्रगती हवी असेल तर तरुणांनी रोज किमान 12 तास काम करायला हवं, म्हणजेच आठवड्याचे 70 तास. तेव्हाच भारत अशा अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करु शकेल, ज्या गेल्या दोन ते दशकांपासून प्रचंड यशस्वी आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमधील नागरिकांनी हेच केलं होतं," असं नारायणमूर्ती म्हणाले आहेत. त्यांनी पॉडकास्ट 'द रेकॉर्ड' साठी इंफोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्यांशी संवाद साधताना हा सल्ला दिला. 



नारायणमूर्ती यांच्या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या सल्ल्याशी आपण अजिबात सहमत नसल्याचं सांगत टीका केली आहे. कॉमेडियन वीर दास यानेही एक्सवर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं असून टोला लगावला आहे. टीका करताना त्याने नारायणमूर्ती यांचे जावई आणि इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनाही त्यात ओढलं आहे. 


'...अन् तुम्ही इंग्लंड चालवता'


वीर दासने लिहिलं आहे की, "आयुष्य किती कठीण आहे. तुम्ही एका मुलीला भेटता, प्रेम होतं, लग्न होतं आणि मुलीच्या वडिलांची इच्छा आहे की, तुम्ही 70 तास काम करावं. तुम्ही इतकी मेहनत घेऊ शकत नाही, तुम्हाला मजा करायची आहे आणि मग तुम्ही इंग्लंड चालवता". वीर दासने या ट्वीटमधून ऋषी सुनक यांच्यावर निशाणा साधला आहे. 



पुढे त्याने लिहिलं आहे की, "जर तुम्ही आठवड्यातील 5 दिवसात 70 तास काम करत असाल तर सकाळी 9 ते रात्रीचे 11 वाजतील. 12.30 वाजता तुम्हाला घऱी यावं लागेल आणि सकाळी 7.30 वाजता पुन्हा ऑफिसला जायचं? तुम्हाला तुमच्या बॉसच्या ऑफिसमध्ये पादण्याची परवानगी दिली पाहिजे. जर तुम्ही एखाद्या नात्यात वचनबद्दता अपेक्षित असेल तर मग थोडी इंटिमसीपण स्विकारावी लागेल".



वीर दास याच्याप्रमाणे अनेक नेटकरी नारायणमूर्ती यांच्या विधानाचा निषेध करत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, जर कॉलेजपासूनच 70 तास काम केलं तर यांच्या इंफोसिस कंपनीत जाण्याची गरज नाही. तर एका युजरने लिहिलं आहे की, घर आणि नोकरी अशा दोन्ही आघाडींवर असणाऱ्या महिलांना तर नोकरी सोडावी लागेल. तर एकाने त्यांना देशातील कित्येक तरुण 12 तासांच्या नोकरीव्यतिरिक्त रोज 3 तास प्रवास करतात त्याचाही विचार करा असं सांगितलं आहे.