अहमदाबाद : भारतीयांचा आवडता चाट पदार्थ म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरी नुसते नाव उचारताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी न आवडणारी व्यक्ती फार क्वचितच असेल. खिशाला परवडणारा आणि जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या चाट पदार्थाचा व्यवसाय कोट्यवधींचा असू शकतो याची कधी आपण कल्पना ही केली नसेल. पण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधून पाणीपुरीची वाढती मागणी लक्षात घेऊन अहमदाबाद येथील एका कंपनीने या व्यवसायात १०० कोटी गुंतवण्याचा विचार केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाणीपुरी, पापड आणि पास्ताचे उत्पादन करणाऱ्या ‘इनोव्हेटिव्ह फूड प्रॉडक्ट’ असं या कंपनीचं नाव आहे. ‘शेअरइट’ या नावाने कंपनीची उत्पादनं बाजारात प्रसिद्ध आहेत. या कंपनींच्या पाणीपुरीला फक्त भारतातच नाही तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि मध्यपूर्वेतील देशांतूनही मोठी मागणी येऊ लागली आहे. त्यामुळे वाढती मागणी लक्षात घेता या व्यवसायात २०२० पर्यंत १०० कोटींची गुंतवणूक करण्याचा कंपनीचा विचार आहे. या कंपनीचे सहसंस्थापक अंकित हंसालिया यांनी ‘डीएनएला’शी बोलताना यासंबधी माहिती दिली. 


भविष्यात मध्यपूर्वेतील देश, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाणीपुरी किट आणि मल्टीग्रेन पाणीपुरीची विक्री करण्यासाठी आवश्यक ती तयारी कंपनीने सुरू केली आहे. सध्याच्या घडीला उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांत आणि बांगलादेश, नेपाळमध्ये या कंपनीच्या उत्पादनांची विक्री होते.