नवी दिल्ली : २०१२ साली भारतासहीत जगाला हादरा देणारं 'निर्भया हत्याकांड' घडल्याचं समोर आलं. आता याच प्रकरणात दिल्ली पोलिसांत आणखी एक तक्रार दाखल करण्यात आलीय. ही तक्रार 'निर्भया हत्याकांडा'तील फाशिची शिक्षा मिळालेल्या चार आरोपींपैंकी एका आरोपीच्या पित्याकडून दक्षिण पश्चिम दिल्ली जिल्ह्याच्या डीसीपी आणि आर के पुरम पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलीय. ही तक्रार निर्भयाच्या 'त्या' कथित मित्राविरुद्ध आहे जो या प्रकरणानंतर काही दिवसांनी सर्व टीव्ही चॅनेलवर प्रसंग कथन करताना दिसला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कालपर्यंत ज्या व्यक्तीला निर्भयाचा मित्र, घटनेचा प्रत्यक्षदर्शी म्हणून समोर आणलं गेलं तो खोटारडा आहे. केवळ आर्थिक फायद्यासाठी त्यानं सगळ्या गोष्टी मीडियासमोर कथन केल्या, असं तक्रारीत म्हटलं गेलंय. २ नोव्हेंबर २०१९ रोजी ही तक्रार दाखल करण्यात आलीय. 


तक्रारदाराच्या नाव-पत्त्याच्या ठिकाणी हिरालाल गुप्ता पुत्र नौरंगी लाल गुप्ता, पत्ता - जे ६४ रविदास कॅम्प, सेक्टर ३, आर के पुरम असं लिहिण्यात आलंय. प्रत्यक्षात हिरालाल गुप्ता यांचा दोषी मुलगा पवन कुमार गुप्ता दिल्लीच्या मंडोली स्थित १४ क्रमांकाच्या तुरुंगात बंद आहे. त्याच्यासोबत मुकेश अक्षय कुमार सिंह, विनय कुमार शर्मा हेदेखील आरोपी तुरुंगात आहेत. 


२०१२ साली घडलेल्या निर्भया हत्याकांडानं अनेकांना हादरवून सोडलं होतं

'निर्भयाचा मित्र' म्हणून मीडियाला मुलाखती देणारा तरुण पैसे घेऊन घटनेबद्दल खोट्या गोष्टी सांगत होता, असं ऑक्टोबर २०१९ मध्ये आपल्याला माहीत पडल्याचंही तक्रारकर्त्यानं म्हटलंय. या तक्रारीत टीव्ही चॅनलच्या दोन-तीन वरिष्ठांनाही साक्षीदार म्हणून सादर करण्यात आलंय. 


काही दिवसांपूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलच्या व्यवस्थापकीय संपादकानं सोशल मीडियावर, निर्भयाचा मित्र आणि घटनेचा एकमेव साक्षीदार पैसे घेऊन मीडियाला मुलाखती देत होता, असं म्हटलं होतं. 'या संपूर्ण घटनेचं स्टिंग ऑपरेशन करूनही घटनेला वेगळं वळण लागू नये आणि आरोपींना त्याचा फायदा मिळू नये' यासाठी ते जाहीर न केल्याचंही या संपादकानं म्हटलं होतं. 



उल्लेखनीय म्हणजे, निर्भया हत्याकांड प्रकरण वसंत विहार पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतं. परंतु, ही तक्रार आर के पुरम स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलीय. तक्रारकर्ता आर के पुरम भागाचा रहिवासी असल्यानं वसंत विहार स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करून घेण्यात आली नसल्याचं एसएचओ इन्स्पेक्टर रवि शंकर यांनी म्हटलंय.