हैदराबाद: देशातील मुस्लिम समाजाने आता काँग्रेस पक्षाची साथ कायमची सोडायला हवी, असे मत एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले. ते रविवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाला उद्देशून म्हटले की, तुम्हाला काँग्रेस आणि निधर्मीवादी पक्षांची साथ अजूनही सोडावीशी वाटत नाही. मात्र, एक लक्षात ठेवा की, त्यांच्यात आता सामर्थ्य, विचारशक्ती उरलेली नाही. या पक्षातील नेत्यांमध्ये मेहनत करण्याचीही तयारी नाही. लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये भाजपचा पराभव का झाला? कारण, त्याठिकाणी शीख समाज आहे. देशात आणखी काही भागांमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. याठिकाणी भाजपचा पराभव हा प्रादेशिक पक्षांमुळे झाला, काँग्रेसमुळे नव्हे, याकडे असुदुद्दीन ओवेसी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील विजयाचा उल्लेख केला. राहुल गांधी अमेठीत हरले, पण वायनाडमध्ये मात्र विजयी झाले. वायनाडमधील ४० टक्के मुस्लिम मतदारांमुळेच त्यांना विजय मिळाला ना?, असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला. 


भारतामध्ये मुस्लीम म्हणजे भाडेकरू नाहीत, आमचा हिस्सा बरोबरीचा- ओवैसी


तसेच ओवेसी यांनी भारतामध्ये मुस्लिमांना बरोबरीचा हक्का मिळाला पाहिजे, या आपल्या भूमिकेचे पुन्हा एकदा समर्थन केले. त्यांनी म्हटले की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या पूर्वजांना आतापासून नव्या भारताच्या निर्मितीला प्रारंभ होईल, असे वाटले होते. भारत देश हा आझाद, गांधी, नेहरू, आंबेडकर आणि त्यांच्या कोट्यवधी अनुयायांचा असेल, अशी अपेक्षा होती. आम्हाला (मुस्लिम) या देशात हक्काचे स्थान मिळेल, अशी आशा अजूनही मला वाटते. आम्हाला तुमची खिल्लत नको, आम्हाला त्यावर जगायचेही नाही, असे ओवेसी यांनी सांगितले.