Congress announces Jai Bharat Satyagraha : काँग्रेसने देशव्यापी  'जय भारत' आंदोलनाचा नारा दिलाय. पुढील 30 दिवस काँग्रेस कार्यकर्ते देशभर  'जय भारत सत्याग्रह' करणार आहेत. देशात लोकशाही संकटात असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. त्यासाठी काँग्रेस पदाधिकारी, खासदार, आमदार विविध ठिकाणी आंदोलन करणार आहेत. 19 विरोधी पक्षांची मोट बांधली जाईल. उद्योगपती गौतम अदानी प्रकरणात जेपीसीची मागणी विरोधक लावून धरणार आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 काँग्रेसने 30 एप्रिलपर्यंत देशव्यापी निदर्शने करण्याचे जाहीर केले आहे. 1 एप्रिल रोजी, कार्यकर्ते प्रत्येक राज्याच्या राजधानीत  रॅली काढण्याची योजना आखली आहे. 3 एप्रिलपासून काँग्रेसकडून जय भारत सत्याग्रह राजकीय मोहीम सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय, कार्यकर्ते देशभरात 15 ते 20 एप्रिलपर्यंत विविध जिल्हा मुख्यालये आणि  जिल्हाधिकारी कार्यालयांना घेराव घालतील. 20-30 एप्रिल रोजी राज्य स्तरावर आंदोलन करण्यात येणार आहे.


दिल्लीत जोरदार निदर्शने


राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरु केले आहे. काँग्रेसने काल रात्री नवी दिल्लीत जोरदार निदर्शनं केली. मशाल यात्रा काढत मोर्चा लाल किल्ल्यासमोरील चौकात जमा झाला. लाल किल्ल्यासमोर निदर्शनं करण्यात आली. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे पोलिसांनी मोर्चाला अटकाव केला. पोलिसांनी ९६ जणांना ताब्यात घेतलंय. काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलंय. 


सावरकरांवरुन महाविकास आघाडीत ठिणगी पडलेली असताना मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस आता सावरकरांचा विषय सार्वजनिकपणे उचलणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत दोघांमध्ये सावरकरांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या भेटीनंतर सावरकरांच्या विषयाबाबत राहुल गांधी यांनी एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा आहे.