शरद पवार दिल्लीत, सोनिया गांधी यांनी बोलावली वरिष्ठ पक्ष नेत्यांची बैठक
एकीकडे विरोधी पक्ष राष्ट्रीय स्तरावर एकत्र येत आहे, तर काँग्रेस (Congress) आता स्वबळाबाबत चाचपणी करत आहे.
मुंबई : एकीकडे विरोधी पक्ष राष्ट्रीय स्तरावर एकत्र येत आहे, तर काँग्रेस (Congress) आता स्वबळाबाबत चाचपणी करत आहे. मंगळवारी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरी राष्ट्रीय मंचची बैठक होणार आहे, तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांनी 24 जून रोजी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सरकारला घेराव घालण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत पक्षाचे सरचिटणीस आणि राज्यस्तरीय प्रभारी यात सहभागी होतील. या डिजिटल बैठकीत काँग्रेसचे नेते पक्षाच्या प्रस्तावित कनेक्टिव्हिटी मोहिमेवरही चर्चा करतील, असे सूत्रांनी सांगितले.
या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता
या बैठकीत पेट्रोल-डिझेल आणि आवश्यक खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत, या संदर्भात पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल. कोविड -19 ची सद्यस्थिती आणि आर्थिक परिस्थिती यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते. या बैठकीनंतर राज्य काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठकही बोलविण्यात येणार आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी संसदेची बैठक
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाची बैठक बोलावली आहे. येत्या गुरूवारी 24 तारखेला ही बैठक होणार आहे. वर्तमान राजकीय स्थितीवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस, राज्यांचे प्रभारी, तसंच प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत सोनिया गांधी यावेळी चर्चा होईल. व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सोनिया गांधी सर्वांशी संवाद साधतील. सोनिया गांधी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत ही बैठक बोलविली आहे. जुलै महिन्यात पावसाळी अधिवेश सुरु होत आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेस गेल्या काही आठवड्यांपासून सरकारवर सातत्याने हल्लाबोल करीत आहे.
2024 साठी विरोधी संघटना एकत्र येत आहेत
दुसरीकडे, पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या विजयात महत्वाची भूमिका निभावणारे प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुका 2024 मध्ये विरोधी पक्षांना एकत्र करणे सुरू केले आहे. सोमवारी प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आता मंगळवारी राष्ट्रीय मंचची बैठक होणार आहे.
शरद पवार यांच्या घरी बैठक होणार
मोदी सरकारच्या धोरणांविरोधात राष्ट्रीय मंचाची बैठक मंगळवारी संध्याकाळी चार वाजता दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी दिल्ली येथे होणार आहे. शरद पवार पहिल्यांदाच राष्ट्रीय मंच बैठकीस उपस्थित राहतील.
काँग्रेसचे नेते या बैठकीला अनुउपस्थित
मंगळवारी (22 जून) शरद पवार यांच्या घरी होणाऱ्या राष्ट्रीय मंच बैठकीला काँग्रेसचे नेते सहभागी होणार नाहीत. तर काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा आणि मनीष तिवारी हे राष्ट्रीय मंचशी संबंधित आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी शरद पवार यांच्या घरी असलेल्या राष्ट्रीय मंचच्या बैठकीमुळे हे काँग्रेसचे नेते यामध्ये सहभागी होणार नाहीत. ही बैठक तिसऱ्या आघाडीची जुळवाजुळसाठी मानली जात आहे. मात्र काँग्रेस नेत्यांनी स्वत:ला यापासून दूर ठेवले आहे.