नवी दिल्ली : मंगळवारी गृहमंत्रालयाकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावे एक नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये त्यांच्या नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काही प्रश्न उपस्थित केल्याचं नमूद करण्यात आलं होतं. खासदार स्वामी यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा गृहमंत्रालयात नेला ज्यानंतर त्यांच्या यांच्या चौदा पानी तक्रारीवरून राहुल गांधी यांना ही नोटीस बजावण्यात आली. त्यांनी तातडीने यात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असे निर्देशही त्या नोटीसमधून देण्यात आले. या साऱ्या प्रकारावर गांधी यांची बहिण आणि काँग्रेसच्या महासचिवपदी असणाऱ्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी हा प्रश्न विचारणाऱ्यांवर आगपाखड केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल यांच्याविरोधात उपस्थित केले जाणारे प्रश्न पाहता प्रियंका यांची संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाली. 'सारा देश जाणतो की, राहुल गांधी भारतीय आहेत. लोकांनी त्यांना जन्माला आल्यापासून भारतातच मोठं होताना पाहिलं आहे', असं म्हणत 'क्या बकवास है ये' या शब्दांत त्यांनी विरोधकांनाच थेट प्रश्न केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांची ही संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाली. 



सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये राहुल गांधी हे भारतीय नसल्याच्या काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. युनायडेट किंग्डमस्थित एका कंपनीच्या संचालकांच्या यादीत राहुल गांधी यांच्याही नावाचा समावेश होता, असं म्हणत त्यावेळी गांधी यांनी आपण ब्रिटीश नागरिक असल्याचं २००५-०६ या वर्षासाठी दाखल करण्यात आलेल्या कंपनीच्या वार्षिक आर्थिक अहवालात नमूद केलं होतं असा आरोपही त्यांनी केला. 



गांधी यांच्यावर साधारण महिनाभरापूर्वी अमेठी येथून निवडणूकीत उभ्या असणाऱ्या ध्रुव लाल यांनीही काही आरोप केले होते. पण, अमेठीचे रिटर्निंग ऑफिसर मनोहर मिश्रा यांनी मात्र काँग्रेस अध्यक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी सुपूर्त केलेली सर्व माहिती आणि कागदपत्र हे वैध असल्याचं स्पष्ट केलं होतं. लाल यांनी काही अवैध कागदपत्रांच्या प्रती सादर केल्या होत्या. शिवाय त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतही खुद्द राहुल गांधी यांनी स्वत:च्या ब्रिटीश नागरिकत्वाविषयीची माहिती दिल्याचे आरोप करण्यात आले होते. नागरिकत्वाच्या मुद्द्यावर उपस्थित करण्यात आलेले हे प्रश्न आणि रंगणारं राजकारण पाहता ऐन लोकसभा निवडणुकांच्या काळात राहुल गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीवर काही परिणाम होणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.