नवी दिल्ली: राज्यसभेच्या उभसभापतिपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह हे विजयी झाले. यानंतर आम आदमी पक्षाने (आप) यासाठी काँग्रेसला जबाबदार धरत पक्षावर सणसणीत टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणुकीसाठीच्या मतदानावर 'आप'ने बहिष्कार टाकला होता. मात्र, यासाठी काँग्रेस पक्षाची आडमुठी भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप 'आप'ने केला. किंबहुना काँग्रेस हाच विरोधकांच्या ऐक्यातील सर्वात मोठा अडथळा  असल्याचे आपने म्हटले. 


राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून हरिवंश नारायण सिंह यांना, तर संयुक्त पुरोगामी आघाडीकडून बी. के. हरिप्रसाद यांना उमेदवारी दिली होती. राज्यसभेत आज निवडणूक घेण्यात आली. सुरुवातीला आवाजी मतदान घेण्यात आले. मात्र, कोणताही निर्णय होऊ न शकल्याने मतदान घ्यावे लागले.


या मतदानात एनडीएच्या हरिवंश नारायण सिंह यांना १२५ मते मिळाली. तर यूपीएचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांना १०५ मते मिळाली.  या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिवंश नारायण सिंह यांचे जागेवर जाऊन अभिनंदनही केले.