पंतप्रधान मोदींची प्रशंसा थरूर यांना महागात पडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करणे कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना महागात पडणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करणे कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना महागात पडणार आहे. कॉंग्रेस पार्टीतर्फे त्यांना नोटीस पाठवून जाब विचारण्यात येणार आहे. यामुळे शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पंतप्रधान मोदींची प्रशंसा केल्याप्रकरणी आम्ही थरूर यांच्याकडून स्पष्टीकरण मागू असे केरळ कॉंग्रेसचे अध्यक्ष मुलापल्ली रामचंद्रन यांनी म्हटले आहे. ते कन्नूर येथे बोलत होते. थरूर यांनी दिलेल्या स्पष्टीरकरणानंतर पुढची कार्यवाही ठरेल असेही ते म्हणाले.
जर नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत तर त्याची प्रशंसा व्हायला हवी हे मी गेल्या सहा वर्षांपासून बोलत आहे. कारण जेव्हा ते काही चुकीचे करतील तेव्हा त्यावर आम्ही टीका करु त्यात विश्वासआर्हता राहील असे शशी थरूर यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले होते. माझ्या या मताला सहमती दर्शविणाऱ्या विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांचेही स्वागत करतो. याच कारणासाठी माझ्यावर त्यावेळी टीका झाली होती.