नवी दिल्ली : मध्य प्रदेशात काँग्रेसमधील बंडखोरीमुळे कमलनाथ सरकार अडचणीत आलं असताना बंगळुरूमध्ये थांबलेल्या बंडखोर २२ आमदारांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना पोलिसांनी रोखलं. पोलिसांबरोबर हुज्जत घातल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी हॉटेलबाहेरच धरणं धरलं. त्यानंतर पोलिसांनी दिग्विजय सिंह यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांनी तिथंच उपोषण सुरु केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशमधला राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. राज्यपालांनी कमलनाथ सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आदेश दोनदा दिला. पण विश्वासदर्शक ठराव मांडण्यास नकार देणाऱ्या कमलनाथ यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. एकीकडे सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह बंगुळुरूमध्ये पोहचले. तिथं रामाडा हॉटेलमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया गटाचे २२ आमदार राजीनामे देऊन थांबले आहेत. त्यांना भेटण्यासाठी पोहचलेल्या दिग्विजय सिंह यांना हॉटेलबाहेरच पोलिसांनी रोखले.




हॉटेलबाहेर दिग्विजय सिंह यांनी पोलिसांबरोबर हुज्जत घातली. ‘'मी राज्यसभेचा उमेदवार आहे. हॉटेलमध्ये डांबून ठेवलेले आमदार माझे मतदार आहेत. त्यांना भेटण्यासाठी मी आलो आहे. तर मला भेटू का दिलं जात नाही?’’ असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला. ‘’मी काँग्रेसच्या आमदारांना भेटत आहे, भाजपच्या नाही,’’ असं त्यांचं म्हणणं होतं. पोलिसांनी भेट नाकारली तेव्हा दिग्विजय यांनी तिथेच ठिय्या मांडला. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. दिग्विजय सिंह यांनी तिथेच उपोषण सुरु करत असल्याची घोषणा केली.




याआधी कर्नाटकातील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनीही काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. या आमदारांना डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवाय मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते जितू पटवारी यांनीही बंडखोर आमदारांना भेटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची पोलिसांबरोबर जुंपली होती.