`भाजपवाल्यांनो, अभिनंदन; तुमची मोहीम फत्ते झाली`
डी.के. शिवकुमार यांची अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नवी दिल्ली: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांनी केलेल्या ट्विटने अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. या ट्विटमद्ये त्यांनी म्हटले आहे की, भाजपमधील माझ्या मित्रांनो मी तुमचे अभिनंदन करतो. अखेर मला अटक करण्याची तुमची मोहीम यशस्वी ठरली. आयकर विभाग आणि ईडीने माझ्याविरोधात दाखल केलेले खटले राजकीय हेतून प्रेरित आहेत. मी भाजपच्या सूडाच्या आणि द्वेषाच्या राजकारणाचा बळी ठरलो, असे डी.के. शिवकुमार यांनी म्हटले.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून त्यांची चौकशी सुरु होती. गेल्या आठवड्यात डी.के. शिवकुमार यांची ईडीच्या चौकशीला हजर न राहण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. यानंतर ते दिल्लीत चौकशीसाठी दाखल झाले होते. तेव्हापासून चारवेळा ईडीने त्यांची चौकशी केली आहे.
आयकर विभागाने डी.के. शिवकुमार यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केल्याचे समजते.
डी.के. शिवकुमार यांची अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. सध्या ते सीबीआयच्या कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. यानंतर काँग्रेसचा आणखी एक बडा नेता 'ईडी'च्या फेऱ्यात सापडल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.