मणिपूरमध्ये राहुल गांधींचा ताफा अडवला, हिंसाचार पीडितांना भेटण्यापासून रोखलं
Rahul Gandhi in Manipur: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या मणिपूर (Manipur) दौऱ्यावर गेले आहेत. राहुल गांधी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर असून यावेळी ते हिंसेची छळ बसलेल्या पीडितांची भेट घेणार आहेत. यासाठी ते मदत शिबीरांमध्ये जाणार आहेत.
Rahul Gandhi in Manipur: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हिंसाचार उफाळलेल्या मणिपूरच्या (Manipur) दौऱ्यावर पोहोचले आहेत. राहुल गांधी दोन दिवस मणिपूरमध्ये असणार आहेत. मणिपूरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी विमानतळावरुन थेट हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी गेले होते. पण पोलिसांनी रस्त्यातच त्यांचा ताफा अडवला आहे. पोलिसांनी परिसर हिंसाचारामुळे धगधगता असल्याचं कारण दिलं आहे. राहुल गांधी यांचा ताफा बिष्णूपूर जिल्ह्यात रोखण्यात आला आहे. राहुल गांधी इंफाळपासून फक्त 20 किमी पुढे जाऊ शकले आहेत.
राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सकाळी दिल्लीहून विमानाने ते मणिपूरसाठी रवाना झाले. राहुल गांधी 29 आणि 30 जून असे दोन दिवस मणिपूरमध्ये असणार आहेत. यावेळी ते मदत शिबिरांचा दौरा करणार असून, पीडितांशी चर्चा करत त्यांची स्थिती जाणून घेणार आहेत. याशिवाय राहुल गांधी राजधानी इंफाळ आणि चुराचांदपूर येथील सिव्हिल सोसायटीच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. राहुल गांधी दुपारी तुइबोंगच्या ग्रीनवूड अकॅडमी आणि चुराचांदपूर येथील सरकारी कॉलेजमध्ये जाणार आहेत. यानंतर ते कोन्जेंगबामधील सार्वजनिक हॉल आणि मोइरांग कॉलेजात जाणार आहेत.
मणिपूरमध्ये गेल्या 52 दिवसांपासून हिंसाचार सुरु असून जाळपोळ केली जात आहे. येथे आतापर्यंत 120 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसंच मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरचा दौरा केला होता. तसंच मदत शिबीरांमध्ये जाऊन पीडितांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. तसंच एका आठवड्यापूर्वी त्यांनी दिल्लीत मणिपूरसंबंधी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. 18 पक्षांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. या बैठकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाने मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसंच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही केली होती.
मणिपूरमधील जातीय संघर्षानंतर आतापर्यंत जवळपास 50 हजाराहून अधिक लोक 300 पेक्षा जास्त मदत शिबीरांमध्ये वास्तव्यास आहेत. दरम्यान दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी अमित शाह यांची भेट घेत त्यांना परिस्थितीची माहिती दिली होती.
गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बीरेन सिंह यांनी ट्विट करत सांगितलं होतं की, "दिल्लीत मणिपूरमध्ये नेमकी काय स्थिती आहे याची माहिती देण्यात आली आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वात राज्य आणि केंद्र सरकार गेल्या आठवड्यात हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालं आहे. 13 जूनपासून हिंसाचारात कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य असणारं प्रत्येक पाऊल उचललं जाईल असं आश्वासन दिलं आहे. राज्यातील लोकांनाही शांतता राखण्याचं आवाहन आहे".
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावरुन आल्यानंतर मणिपूरमधील स्थितीची माहिती घेतली होती. तसंच गरज असणारी सर्व पावलं उचलण्याचे निर्देश दिले होते.