काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. यावेळी राजकारणातील घराणेशाहीवरुन त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना लक्ष्य केलं. भाजपा तुमच्यावर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता राहुल गांधी संतापले. अमित शाह यांचा मुलगा काय करतो? राजनाथ सिंग यांचा मुलगा काय करतो? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मला जिथपर्यंत माहिती आहे, अमित शाह यांचा मुलगा भारतीय क्रिकेट चालवतो. भाजपाने आधी आपली मुलं काय करतात हे पाहिलं पाहिजे. अनुराग ठाकूर यांच्याव्यतिरिक्त अन्यही बरेच लोक आहे, जे घऱाणेशाहीच्या राजकारणाचं उदाहरण आहेत," असं राहुल गांधी म्हणाले.


"काँग्रेस हिंसेचा विरोध करते"


राहुल गांधी यांनी यावेळी इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावर आपलं मत मांडलं. आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या विरोधात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. "आम्ही निर्दोष नागरिकांच्या विरोधातील कोणत्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन करत नाही. आम्ही प्रत्येक प्रकारच्या हिंसेचा विरोध करतो, मग ती कोणी आणि कशाप्रकारे केली आहे याचा फरक पडत नाही," असं राहुल गांधी म्हणाले. 


'निर्दोषांच्या हत्येचा विरोध'


"आमच्यासाठी ही गोष्ट स्पष्ट आहे. हिंसेला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जे कोणी लोकांचं जीव घेतं, ते चुकीचं आहे. नागरिकांची हत्या करणं गुन्हा आहे. आम्ही निर्दोष नागरिकांची कोणत्याही प्रकारे हत्या करण्याला विरोध करतो. मग ती हत्या कुठेही झालेली असो", असं राहुल गांधी म्हणाले. 


एक दिवस आधी राहुल गांधी निवडणूक प्रचारासाठी मिझोरमला गेले होते. मिझोरम काँग्रेसने सांगितलं होतं की, राहुल गांधी 7 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.