सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या इंजिनिअर अतुल सुभाषला (Atul Subhash) न्याय द्यावा अशी मागणी करत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांच्या वाहनाचा पाठलाग केला. अतुल सुभाषचा फोटो दाखवत त्यांनी राहुल गांधींचं या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी धावत्या कारमधून त्यांच्याकडे चौकशी केली आणि शेवटी त्यांच्या दिशेने चॉकलेट फेकत उत्तर दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

34 वर्षीय तंत्रज्ञ अतुल सुभाषने विभक्त झालेली पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल करून आपला आणि आपल्या कुटुंबियांचा छळ केल्याचा आरोप करत 9 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. 80 मिनिटांच्या व्हिडिओ आणि 24 पानांच्या सुसाईड नोटमध्ये अतुलने आरोप केला आहे की निकिताने पैसे उकळण्यासाठी अनेक केसेस केल्या होत्या आणि त्यांना त्यांच्या मुलाला भेटण्यासही नकार दिला होता.


अतुल सुभाषच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशभरात हा मुद्दा चर्चेत असून, महिलांकडून होणारा कायद्याचा गैरवापर यासंदर्भात वाद-विवाद सुरु आहे. पण सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्याने यावर भाष्य करत मुद्दा उपस्थित केलेला नाही. 



हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावर वर्षानुवर्षे आवाज उठवणाऱ्या वकील-कार्यकर्त्या दीपिका नारायण भारद्वाज यांनी अतुल सुभाषला न्याय देण्याची मागणी केली आहे. महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांचा पुरुष आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्यासाठी गैरवापर केला जात आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. कारचा पाठलाग करतानाचा व्हिडिओ शेअर करताना भारद्वाज यांनी सांगितलं आहे की, त्या आणि इतर काही जण अतुल सुभाष यांच्या स्मरणार्थ शोक सभेसाठी जात असताना त्यांना राहुल गांधींचा ताफा दिसला.


"#अतुलसुभाष यांनी केलेल्या दुःखद आत्महत्येबद्दल आणि भारतातील अनेक पुरुषांच्या आत्महत्येमागील कारणांबद्दल कोणताही खासदार बोलला नाही. आम्ही दिल्लीत शोकसभेसाठी जात असताना, आम्हाला राहुल गांधी दिसले. त्यांचे सुरक्षारक्षक आमच्यावर ओरडत असतानाही आम्ही त्यांना अतुलबद्दल आणि त्याने टोकाचं पाऊल उचवण्याचं कारण सांगितलं," असं त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. 


व्हिडिओमध्ये भारद्वाज आणि त्यांचे मित्र राहुल गांधींच्या गाडीच्या समांतर गाडी चालवताना दिसत आहेत. राहुल गांधींचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अतुलच्या फोटोसह पोस्टर लावले आणि आवाज दिला. राहुल गांधींसह असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अडून राहिले. अखेरीस, त्यांना राहुल गांधींचं लक्ष वेधण्यात यश मिळालं. दोन्ही कार समांतर असताना त्यांनी राहुल गांधींना अतुल सुभाषच्या आत्महत्येची माहिती दिली. यानंतर शेवटी राहुल गांधी कारमध्ये काहीतरी फेकताना दिसले. ते चॉकलेट होतं असं नंतर दीपिका यांनी सांगितलं.