Video: ड्रग्ज प्रकरणात काँग्रेस आमदार पोलिसांच्या ताब्यात! पोलीस सकाळीच बेडरुममध्ये शिरले अन्...
Congress Leader Detained By Police: सकाळी सकाळी पोलीस या आमदाराच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी अटकेची कारवाई सुरु केली. आमदारानेच आपल्या फेसबुकवरुन या अटकेचा लाइव्ह व्हिडीओ शेअर केला आहे.
Congress Leader Detained By Police: पंजाब पोलिसांनी गुरुवारी सकाळी केलेल्या एका कारवाईमध्ये भुलत्थचे आमदार आणि काँग्रेसचे नेता सुखपाल सिंग खैरा यांना चंदीगढमधील सेक्टर-5 मधील राहत्या घरातून अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फाजिल्का येथील जलालाबादमध्ये अंमली पदार्थ आणि सायक्रोट्रोपिक सबस्टन्स अधिनियम 1985 (एनडीपीएस- 1985) अंतर्गत एका जुन्या प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी पोलीस अधिक्षक दर्जाचा अधिकाऱ्याबरोबरच फाजिल्का पोलीस स्टेशनच्या एक तुकडीने आमदाराच्या निवासस्थानी जाऊन अटकेची कारवाई केली.
अटकेदरम्यान फेसबुकवरुन लाइव्ह वेबकास्ट
संतापलेल्या सुखपाल सिंग खैरा यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून राज्यातील आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर मनमानी कारभाराचा आरोप केला आहे. फेसबुक लाइव्ह वेबकास्टच्या माध्यमातून केलेल्या आरोपांमध्ये राजकीय हेतूने प्रेरीत होऊन मला मुद्दाम त्रास देण्यासाठी हे सारं केलं जात असल्याचंही सुखपाल सिंग खैरा यांनी म्हटलं आहे. पोलीस घरामध्ये घुसले तेव्हापासून सुखपाल सिंग खैरा यांच्या फेसबुकवर लाइव्ह करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये ते अटकेसाठी आलेल्या पोलिसांबरोबर वाद घालताना दिसत आहेत. ते पोलिसांकडे अरेस्ट वॉरंट दाखवण्याची मागणी करताना दिसतात. अटकेसाठी आलेले काही पोलीस कर्मचारी साध्या कपड्यांमध्ये असल्याने सुखपाल सिंग खैरा हे त्यांना तुम्ही पोलीस असल्याचा पुरावा काय असंही विचारत आहेत.
थेट बेडरुममध्ये शिरले पोलीस
सुखपाल सिंग खैरा यांनी लाइव्ह केलेल्या वेबकास्टमध्ये खैरा यांना एक पोलीस कर्मचारी मी अच्छरु राम शर्मा असून जलालाबादचा डीएसपी असल्याचं सांगताना दिसतात. सुखपाल सिंग खैरा यांनी कोणत्या प्रकरणामध्ये ही कारवाई केली जात आहे अशी विचारणाही पोलिसांकडे केली. यावर अच्छरु शर्मा यांनी हे एनडीपीएसचं प्रकरण असल्याचं आमदाराला सांगितलं. यावर खैरा यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याचं पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं. सकाळी सकाळी पोलीस थेट बेडरुममध्ये घुसल्याचा आरोप करत खैरा यांनी या अटकेला विरोध केला.
...म्हणून झाली कारवाई
सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये एनडीपीएस प्रकरणामध्ये सुखपाल सिंग खैरा यांना दिलासा दिला होता. मात्र त्यावेळी पोलिसांना आवश्यकता वाटल्यास ते पुढे तपास करु शकतात असंही म्हटलं होतं. याच आधारावर पंजाब पोलिसांनी सुखपाल सिंग खैरा यांना अठक केली आहे. फाजिल्का ड्रग्स तस्करी प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाच्या आदेशावर 13 एप्रिल 2023 रोजी पंजाब पोलिसांचे डीआयजी स्वप्न शर्मा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास समितीची स्थापना करण्यात आली होती. या तपासानंतर सुखपाल सिंग खैरांचा या तस्करी प्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणातील इतर आरोपींना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आपण या प्रकरणी पुन्हा कोर्टात जाणार असून या कारवाईविरोधात दाद मागणार आहोत असं सुखपाल सिंग खैरांनी म्हटलं आहे.
आपमधून काँग्रेसमध्ये
सुखपाल सिंग खैरा यांनी 2017 मध्ये पंजाबची विधानसभा निवडणूक भुलत्थ मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या तिकीटावर लढवली होती. त्यांनी जानेवारी 2019 मध्ये आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते जून 2021 मध्ये काँग्रेसमध्ये सहभागी झाले. त्यांनी जुलै 2017 ते जुलै 2018 दरम्यान पंजाबच्या विधानसभेमध्ये विरोधीपक्ष नेता म्हणून काम पाहिलं.