दिल्लीत काँग्रेसची नाचक्की, निवडणुकीत ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा भोपळाही फोडता आलेला नाही.
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा भोपळाही फोडता आलेला नाही. ७०पैकी ६७ उमेदवारांचे चक्क डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे काँग्रेसची परती वाट टागल्याचे दिसून येत आहे. मुळातच काँग्रेस पक्षाने मेहनत घेतली नव्हती. भाजप-'आप'च्या भांडणात न पडण्याचे पक्षाचे धोरण होते. मात्र हे कुठवच चालणार, हे पक्षाला आज ना उद्या ठरवावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता. ते अपेक्षितही होते. दिल्लीमध्ये काँग्रेसने फारशी मेहनत घेतलीच नव्हती. सध्या देशभरात भाजप विरुद्ध बाकी सगळे असे चित्र आहे. दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने भाजप विरोधाची स्पेस भरून काढली आहे.
२१ वर्षानंतरही भाजपला अपयश
दिल्लीमधील भाजपचा मतदार निश्चित आहे. २०१५ मध्ये भाजपने केवळ ३ जागा जिंकल्या. मात्र त्यावेळीही पक्षाच्या मतांची टक्केवारी ३२ पूर्णांक ३ टक्के होती. याचाच अर्थ ही मतं कुठेही जाणार नव्हतीच. आता या मतांत वाढ झाली आहे. यावेळी भाजपला ७ जागांवर समाधान मानावे लागत आहे. मात्र, आधीपेक्षा ४ ची अधिक भर पडली आहे, हीच काय ती समाधानाची बाब. या निवडणुकीच प्रश्न होता तो काठावर असलेल्या मतदारांचा. गेल्या निवडणुकीत ही काठावरची मते मिळाल्यामुळे केजरीवाल तब्बल ६७ जागा जिंकू शकले. यावेली ६३ जागांवर त्यांना यश मिळाले आहे.
या निवडणुकीत काँग्रेसनं फारशी मेहनत घेतली नाही, यामुळेच. काँग्रेसनं केवळ नामधारी उमेदवार दिले. प्रभावी प्रचार केलाच नाही.भाजप आणि आपचे तमाम नेते दिल्ली पिंजून काढत असताना काँग्रेसचा एकही मोठा नेता प्रचारात दिसला नाही. दिल्लीत काँग्रेसकडे नेतृत्वासाठी एकही चेहरा नव्हता. राहुल गांधींच्या मोजक्याच सभा झाल्या. कारण स्पष्ट आहे. काँग्रेसला केजरीवालांच्या पायात पाय घालायचा नव्हता. काँग्रेसला मतं मिळाली असती ती काठवरचीच. त्यांनी आपचीच मतं खाल्ली असती आणि याचा थेट फायदा भाजपला झाला असता. आप भाजपला अंगावर घेत असताना मध्ये पडण्यात अर्थ नाही, अशीच काहीशी भूमिका पहिल्यापासून होती. निकालानंतर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. दुसऱ्याच्या विजयामध्ये आपला विजय मानायचं हे धोरण पक्षासाठी फारसं फायदेशीर नाही.
निवडणूक लढायची असते ती जिंकण्यासाठी. सलग तीन वेळा दिल्लीची सत्ता राखणाऱ्या काँग्रेसला लागोपाठ दोन वेळा भोपळाही फोडता येऊ नये, हे एका राष्ट्रीय पक्षाला शोभणारं नाही. या पराभूत मानसिकतेतून काँग्रेसला बाहेर पडण्याची गरज आहे.