२१ वर्षानंतरही पराभव, दिल्लीतील भाजप मुख्यालयात भयाण शांतता

एरव्ही सदैव कार्यकर्त्यांच्या उत्साहाने भरलेले दिल्लीतील भाजप मुख्यालयात भयाण शांतता दिसून आली. 

Updated: Feb 11, 2020, 04:51 PM IST
२१ वर्षानंतरही पराभव, दिल्लीतील भाजप मुख्यालयात भयाण शांतता  title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : एरव्ही सदैव कार्यकर्त्यांच्या उत्साहाने भरलेले दिल्लीतील भाजप मुख्यालयात भयाण शांतता दिसून आली. दिल्ली विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर भाजप मुख्यालयाकडे कार्यकर्ते वळले नाही. आम आदमी पक्षाने सलग दुसऱ्यांदा मोठा विजय मिळवला आहे. 'आप'ने ६३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने ७ जागांवर आघाडी घेतली. अंतिम निकाल घोषित होणार असले तरी 'आप'ने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे 'आप' कार्यालयात जल्लोष दिसून येत आहे. तर भाजपच्या मुख्य कार्यालयात भयाण शांतता पाहायला मिळत आहे. दरम्यान, कितीही प्रयत्न केले तरी भाजपला काय दिल्ली अजूनही गाठता आलेली नाही. २१ वर्षं झाली. पण दिल्लीचे तख्तं भाजप काबीज करु शकले नाही. भाजपसाठी दिल्ली अजूनही दूरच का आहे?

दिल्लीत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. मात्र, भाजपल यश काही मिळाले नाही. भाजपने मंत्री, खासदार आणि इतर राज्यातील प्रमुख नेते निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरविले होते. मात्र, भाजपला दिल्ली काबीज करता आली नाही. मोदी आणि शाह या जोडगोळीला छोटे राज्य दिल्ली जिंकणं मात्र अवघड झाले आहे. मदनलाल खुराना, साहेबसिंग वर्मा आणि सुषमा स्वराज यांनी १९९३ ते १९९८ पर्यंत दिल्ली सांभाळली. सुषमा स्वराज मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या ५१ दिवसांत कांद्याच्या मुद्द्यावर भाजपचं सरकार पडले. त्यानंतर २१ वर्षं झाली.... भाजपचं कमळ काही दिल्लीत फुललं नाही.

२०१९ च्या लोकसभेतही भाजपला दिल्लीनं दणदणीत साथ दिली. पण जेव्हा मुद्दा राज्यातल्या सरकारचा येतो, त्यावेळी मात्र दिल्लीकर २०१४ पासून सातत्यानं केजरीवालांच्या पाठिशी उभे राहत आहेत. यंदा दिल्लीची निवडणूक विकास विरुद्ध राष्ट्रवाद अशीच झाली.धर्मवादाच्या, राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर दिल्लीत आंदोलनांनी राळ उठवली होती. भाजपनं राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली तर केजरीवाल मात्र विकासापासून दूर जायला तयार नव्हते. 
राममंदिराचा निकाल आल्यानंतर, सीएए मंजूर झाल्यानंतर ही दुसरी निवडणूक होती. पण झारखंडप्रमाणेच दिल्लीकरांनी मात्र ध्रुवीकरणाचे प्रयत्न सपशेल नाकारले.

भाजपनं विकासाभिमुख राजकारण करण्याऐवजी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर सातत्याने टीका करत निगेटीव्ह राजकारण केले, त्याविरोधात केजरीवालांनी मात्र कुणालाही टार्गेट केले नाही, त्यामुळे केजरीवाल उजवे ठरले. तिकीटांवरुन मारामारी यंदाही भाजपमध्ये सुरूच राहिली. भाजपकडे दिल्लीसाठीचा असा अजेंडा तयारच नव्हता.  

भाजपचा आकडा गेल्या वेळपेक्षा वाढला, एवढीच काय ती भाजपसाठी त्यातल्या त्यात समाधानाची बाब. मात्र, विरोधी पक्षनेते पद मिळण्याएवढीही ताकद भाजपमध्ये नाही, असा संदेश गेला आहे. तसेच भाजपसाठी अजूनही दिल्ली दूरच आहे.