बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला असला तरी त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानं सत्तेची समीकरणं बदलली आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा जाहीर केलाय. तसेच एक प्रस्तावही सादर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आणि भाजपच्या गोटात एकच आनंदाचे वातावरण निर्माण झालं. मात्र, आता सर्व निकाल समोर आल्यानंतर काँग्रेसने खेळलेल्या खेळीमुळे भाजपला एक जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेसने जेडीएसला दिलेल्या प्रस्तावामुळे आता काँग्रेस-जेडीएस सत्ता स्थापन करणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.


असा आहे काँग्रेसचा प्रस्ताव


काँग्रेसच्या प्रस्तावानुसार, जेडीएसला मुख्यमंत्रीपद आणि ११ मंत्रीपद तर, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद आणि २१ मंत्रीपद मिळायला हवेत. जर काँग्रेसने दिलेला प्रस्ताव जेडीएसने स्वीकारला तर कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसची सत्ता स्थापन होईल.


जेडीएसला मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव काँग्रेसनं दिलाय. जेडीएसनंही हा प्रस्ताव स्वीकारल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. आजच जेडीएससोबत सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचीही माहितीही काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली. बंगळुरूत काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला सिद्धरामय्या यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.


जेडीएसने स्वीकारला प्रस्ताव


जेडीएसने काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारलाय. भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी जेडीएसने काँग्रेसचा हा प्रस्ताव स्वीकारलाय. आज संध्याकाळी साडेपाच वाजता राज्यपालांची भेट घेणार असल्याचं जेडीएसचे प्रवक्ते दानिश अली यांनी म्हटलंय.