नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने आपल्या गावी परतत असलेल्या मजूर आणि कामगारांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे काँग्रेस पक्ष भरणार असल्याची घोषणा सोनिया गांधी यांनी केली. सोनिया गांधी यांनी सोमवारी प्रसिद्धीपत्रक काढले. त्यानुसार प्रत्येक राज्याताली प्रादेशिक काँग्रेस समिती रेल्वेने गावी जाणाऱ्या मजुरांच्या तिकीटाचे पैसे भरेल. देशातील कष्टकरी वर्गाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्यासाठी काँग्रेस हे योगदान देत असल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रकात म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच परराज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना रेल्वेने आपापल्या गावी पाठवले जात आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे अगोदरच रोजगार गमावून बसलेल्या मजुरांना रेल्वे तिकीटाचा खर्च स्वत:च्याच खिशातून करावा लागत आहे. अनेक राज्यांनी तिकीटाच्या खर्चाचा भार रेल्वेनेच उचलावा अशी मागणीही केली होती. मात्र, केंद्र सरकारने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नव्हता.



अखेर काँग्रेस पक्षाने पुढे येत गावी परतणाऱ्या प्रत्येक मजुराच्या तिकीटाचे पैसे भरण्याची तयारी दाखविली आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेवरही बोट ठेवले आहे. केवळ चार तास आधी सूचना देऊन देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे अनेक कामगार परराज्यात अडकून पडले. १९४७ च्या फाळणीनंतर देशाने पहिल्यांदाच इतकी भयानक परिस्थिती अनुभवली. हजारो कामगारांना घरी जाण्यासाठी शेकडो मैलांची पायपीट करावी लागत आहे. त्यांच्याकडे अन्नधान्य नाही, औषधे नाहीत, पैसे नाहीत, आहे ती केवळ आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची ओढ. मात्र, तरीही सरकार गावी जाण्यासाठी या मजुरांकडून तिकीटाचे पैसे वसूल करत आहे. आपण परदेशात अडकलेल्या भारतीयांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विमानाने निशुल्क परत आणतो. जर रेल्वे मंत्रालय पंतप्रधान सहायता निधीसाठी १५१ कोटी रुपये देऊ शकतो. मग आपण या मजुरांना आणि कामगारांना निशुल्क प्रवास का करून देऊ शकत नाही, असा सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केला आहे.