काँग्रेसने नेहमीच अल्पसंख्याकांना झुकते माप दिले- अमित शहा
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ही परिस्थिती बदलली.
भोपाळ: भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका विधानाचा दाखला देत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना म्हटले होते की, देशातील साधनसंपत्ती आणि स्त्रोतांवर सर्वप्रथम अल्पसंख्याकांचा हक्क आहे. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ही परिस्थिती बदलली. हे सरकार आदिवासी आणि गरिबांचे आहे, हे मोदींचे पहिले वाक्य होते, याकडे अमित शहांनी लक्ष वेधले.
ते गुरुवारी मध्य प्रदेशच्या बदवानी येथील प्रचारसभेत बोलत होते. या भागात आदिवासी मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. काँग्रेसने आदिवासींकडे कायम दुर्लक्ष केले. त्यांनी आदिवासी समाजातील नायकांचा कधीच सन्मान केला नाही. काँग्रेसने केवळ एकाच घराण्याची पूजा करण्यात धन्यता मानली, अशी टीक शहा यांनी केली.
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शहा पुढील सात दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये सभा घेणार आहेत.