काँग्रेसला क्रांतीचं लेबल लावून भ्रष्टाचार खपवायचाय- भाजप
ऑगस्टा वेस्टलँड खरेदी व्यवहारातील भ्रष्टाचारावरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत.
नवी दिल्ली: काँग्रेस पक्ष म्हणजे भ्रष्टाचाराच्या क्रांतिकारकांचं टोळकं असल्याची जहरी टीका केंद्रीय मंत्री व भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. ते शनिवारी दिल्लीत प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराच्या क्रांतिकारकांचा समूह आहे. येथे ऑगस्टा वेस्टलँड भ्रष्टाचारालाही ऑगस्टा क्रांती असे लेबल लावून खपवायचा प्रयत्न केला जातो. काँग्रेसचे राज्य आले तर त्यांच्याकडून आतापर्यंत केलेल्या सर्व भ्रष्टाचारांना क्रांतीचे लेबल लावले जाईल, असे नक्वी यांनी म्हटले.
सध्या ऑगस्टा वेस्टलँड खरेदी व्यवहारातील भ्रष्टाचारावरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात थेट गांधी कुटुंबावर आरोप करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच ऑगस्टा व्यवहारातील दलाल ख्रिश्चिअन मिशेलचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती पुढे येईल, असा भाजप नेत्यांचा दावा आहे.
ख्रिश्चिअन मिशेलच्या प्रत्यार्पणानंतर त्याचे वकीलपत्र काँग्रेसच्या नेत्यांनी घेतले होते. यावरूनही भाजप नेते आक्रमक झाले होते. काँग्रेसने मिशेलच्या बचावासाठी आपली टीम पाठवली आहे. काँग्रेस वकील नेते अल्जो जोसेफ हे मिशेलसाठी कोर्टात हजर झाले. अल्जो जोसेफ यांच्याशिवाय आणखी दोन वकीलही मिशेलच्या मदतीसाठी उभे ठाकले आहेत. यांपैकी एक अॅड. विष्णू शंकर जे. केरळमधील काँग्रेसच्या नेत्याचे पूत्र आहेत. तर दुसरे श्रीराम परक्कट हे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे सदस्य आहेत. हे तिघेही काँग्रेसचे मोठे वकील नेते सलमान खुर्शिद आणि कपिल सिब्बल यांच्यासोबत काम करतात.