नवी दिल्ली: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून काँग्रेसने सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन सुरु करण्याची हाक दिली आहे. अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या परिस्थितीवरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षसंघटनेतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. सोनिया गांधी यांनी पक्षाचे हंगामी अध्यक्षपद स्वीकारले असले तरी पक्षातील मरगळ अद्याप कायम आहे. त्यामुळे या आंदोलनाच्यानिमित्ताने काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले जाण्याची शक्यता आहे. 


भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर पाच टक्क्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी प्रतिकूल अंदाज वर्तविले होते. याशिवाय, वाहननिर्मिती क्षेत्रातही मोठ्याप्रमाणावर मंदी असल्याचे दिसून येत आहे. यासाठी केंद्र सरकारने कंपनी करात कपात आणि अन्य आर्थिक उपाययोजनाही करून पाहिल्या होत्या. मात्र, अजूनही अर्थव्यवस्थेने म्हणावी तितकी उभारी घेतलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकार पेचात सापडले आहे. 



दरम्यान, संसदेचे हिवाळी अधिवेशन १८ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या काळात होणार आहे. तेव्हाही काँग्रेससह विरोधकांकडून सरकारला अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून घेरले जाण्याची शक्यता आहे.