नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची धूरा सोपवण्याची चर्चा होत आहे. मात्र, आता  राहुल गांधी यांना काँग्रेसाध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.


काँग्रेस कार्यकर्ते-नेत्यांची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकवेळा काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी राहुल गांधींकडे काँग्रेस पक्षाची सुत्रे द्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वी राहुल गांधीकडे काँग्रेस पक्षाची धूरा सोपवली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.


सोनिया गांधींनी बोलवली बैठक


याच पार्श्वभूमीवर काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करण्याच्या निर्णयावर अंतिम मोहर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


लवकरच होणार अधिकृत घोषणा


काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीने पक्षाच्या अध्यक्षपदासाठी प्रस्तावित तारीख सोनिया गांधी यांना कळवली आहे. काँग्रेस कार्यकारिणीकडून राहुल गांधींच्या नावावर अंतिम मोहर लागल्यानंतरच अधिकृत घोषणेचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.


काँग्रेस कार्यकारिणीला तारखेत बदल करण्याचेही अधिकार आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ डिसेंबरला राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.