लग्न म्हटलं की उत्सुकता, आनंद. उत्साह अशा अनेक भावनांचं मिश्रण असतं. त्यात सध्याच्या जमान्यात लग्न म्हटलं तर प्री-वेडिंग शूट करणं ही एक फॅशनच झाली आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबापासून ते गडगंज श्रीमंत कुटुंबातील जोडप्यांनाही प्री-वेडिंग शूट करण्याचा मोह आवरत नाही. यातील काही प्री-वेडिंग शूट आपल्या हटक्या स्टाईलमुळे व्हायरलही होतात. दरम्यान, असंच एक शूट सध्या चर्चेत आहे. पण हे प्री-वेडिंग शूट व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे हे जोडपं पोलीस अधिकारी आहे. या व्हिडीओत त्यांनी दोन मिनिटांचं गाणं वापरलं आहे. इतकंच नाही तर व्हिडीओच्या सुरुवातीला खाकी वर्दीत आणि सरकारी वाहनात दिसत आहेतय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस जोडप्याचं ही प्री-वेडिंग शूट चांगलंच व्हायरल झालं आहे. सोशल मीडियावर अनेकजण या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. दरम्यान, काहींनी या जोडप्याने व्हिडीओत खाकी वर्दी आणि सरकारी संपत्तीचा वापर केल्याने आक्षेप नोंदवला आहे. यादरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या व्हिडीवओवर भाष्य केलं असून, त्यांनी दिलेला सल्ला व्हायरल झाला आहे. आयपीएस अधिकारी सीव्ही आनंद यांनी या जोडप्याला हा सल्ला दिला आहे. 



आयपीएस आनंद यांनी जोडप्याच्या उत्साहाचं आणि त्यांच्या खाकीवरील प्रेमाचं कौतुक केलं आहे. पण हे थोडंसं लाजिरवाणं असल्याची कबुलीही दिली आहे. तसंच या जोडप्याला भेटून आशीर्वाद देण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.


आयपीएस अधिकाऱ्याने एक्सवर (ट्विटर) नोंदवली प्रतिक्रिया


आयपीएस आनंद यांनी यांनी ट्विटरला पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे की, "मी या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया पाहिल्या आहेत. खरं सांगायचं तर दोघंही मला त्यांच्या लग्नासाठी थोडे अतिउत्साही दिसत आहे आणि हे चांगलं पण थोडं लाजिरवाणं आहे. पोलीस होणं आणि त्यातही खासकरुन महिलांसाठी हे फार कठीण कार्य आहे. पण तिला आपल्याच खात्यातील जोडीदार मिळाला ही आमच्या खात्यासाठी आनंद साजरा करण्याची बाब आहे".



दरम्यान जोडप्याने व्हिडीओत खाकी वर्दी आणि पोलीस वाहनाचा वापर केल्यासंबंधी ते म्हणाले की "ते दोघंही पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी पोलीस खात्याची संपत्ती, चिन्हं वापरणं यात मला फार काही चुकीचं वाटत नाही. जर त्यांनी मला आधीच सांगितलं असतं तर आम्ही नक्कीच त्यांनी परवानगी दिली असती. आपल्यापैकी काहींना राग येत असेल, पण मला त्यांच्या लग्नाला आमंत्रण दिले नसले तरी त्यांना भेटून आशीर्वाद द्यावासा वाटतो. अर्थात, योग्य परवानगीशिवाय याची पुनरावृत्ती करू नका असा सल्ला मी इतरांना देतो".


या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काहींनी जोडप्याने आपल्या खाकी वर्दीचा चुकीचा वापर केल्याची टीका केली आहे. तर काहींनी या जोडप्याकडून टॉलिवूडने काहीतरी शिकावं असा सल्ला दिला आहे.