मुंबई : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात ८.३३ टक्के पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल पंजाब ७.८९ टक्के आणि हिमाचल प्रदेश ७.६९ टक्के या राज्यांची नोंद असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून निदर्शनास येते. दरम्यान, जगात कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. आतापर्यंत जगभरात १४ लाख ३० हजार ५१६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८२ हजार १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचवेळी ३ लाख  १ हजार ८२८ जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५१५० वर पोहोचली आहे. सलग पाचव्या दिवशी ५०० हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत १५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच महाराष्ट्रातही नव्याने रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत देशात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. झोपडपट्टीत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढता दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


मुंबईतल्या वरळीत आणखी ४० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जीजामाता नगर, वरळी कोळीवाड्यातील ३८१ लोकांना वेळीच क्वारंटाईन केलं असल्यानं कोरोनाच्या संसर्गाला काही अंशी तरी आळा घालण्यात यश आलंय. ३८१ पैकी ४० पेक्षा जास्त लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. वरळीतील हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्ण पोद्दार हॉस्पिटल तसंच पवईच्या एम सी एम आर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर जी दक्षिण मधील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा ११५ वर पोहोचला आहे.