कोरोनाबाधित महिलेनं दिला बाळाला जन्म; आई आणि बाळ क्वारंटाइन
भारतात कोरोना बाधितांची संख्या १४ हजार ३७८ वर गेली आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका कोरोनाबाधित महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेने १६ एप्रिल रोजी नंदग्राम येथील खाजगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. शनिवारी संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तिच्यावर आता उपचार सुरू आहेत. सध्या महिलेला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे आई आणि बाळाला एकत्र ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, बाळाची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. भारतात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. दिल्ली आणि मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
भारतात कोरोना बाधितांची संख्या १४ हजार ३७८ वर गेली आहे. तर या धोकादायक विषाणूने आतापर्यंत ४८० रुग्णांचा बळी घेतला आहे. या सर्व घडामोडींमध्ये दिलासादायक बाब म्हणजे १ हजार ९९२ रुणांनी या आजारावर मात केली आहे. तर जगभरात जवळपास २२ लाख ४० हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे १ लाख ५३ हजारांहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.