केरळात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, पहिला व्हायरस या राज्यातच का आढळतो? वाचा
Covid New Variant JN.1 : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगाची चिंत वाढवली आहे. भारतातही नव्या व्हेरिएंटची एन्ट्री झाली असून केरळात या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. गेल्या चोवीस तासात एकट्या केरळात कोरोनाचे 111 रुग्ण आढळलेत.
Covid New Variant JN.1 : कोरोना महामाराची दहशत कमी होत असतानाच पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळात आढळला आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट गेल्या काही व्हेरिएंटपेक्षा जास्त संक्रमित आणि घातक ठरला आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचं नाव JN.1 असं आहे. या व्हेरिएंटचा रुग्ण केरळात आढळल्याने सतर्कचे आदेश देण्यात आले आहेत. केरळात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 111 नवे रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून केरळात लोकांना कोरोनाच्या गाईडलाईन्सचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच लसीकरणावरही जोर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नव्या व्हेरिएंटची केरळात एन्ट्री
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण हा केरळात आढळला होता. 2020 मध्ये कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातलं होतं. भारतातही कोरोनाने प्रवेश केला होता. 30 जानेवारी 2020 मध्ये भारतात कोरोनाचा पहिला रुग्णाची नोंद झाली आणि रुग्ण केरळ राज्यातला होता. यानंतर संपूर्ण देशात कोरोनाने हातपाय पसरले. लाखो लोकांचा या आजाराने बळी घेतला. अनेक संसार उद्धवस्त झाले. नोकरी-धंदे बंद झाले आणि लोकांवर उपासमारीची वेळ आली. संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था बिघडली. यातून सावरण्यासाठी बराच कालावधी जावा लागला. आता देश सावरत असताच पुन्हा एकाद कोरोनाने एन्ट्री केली आहे.
कोरोनाचे अनेक व्हेरिएंट पहिले केरळमध्येच सापडले आहे. आता कोरोना विषाणूचा उपप्रकार असलेला JN.1 केरळमध्ये आढळून आला आहे. अमेरिकेसहीत युरोपमध्ये या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पहिला रुग्ण केरळातच का?
नव्या आजाराचा शिरकाव केरळामध्येच का होतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे केरळ राज्यातील अनेक नागरिक हे नोकरीनिमित्तने दुसऱ्या देशात वास्तव्यास आहेत. जेव्हा त्या देशात एखादा आजार पसरतो तेव्हा तिथले नागरिक भारतात परतात. येताना आपल्याबरोबर तो आजार घेऊन येतात. केरळात परदेशातून येणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे नवे व्हायरस केरळात पहिले आढळण्याचं प्रमाण अधिक आहे.
JN.1 व्हेरिएंटची लक्षण
कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन 1 हा रोगप्रतिकारशक्तीला चकवा देण्यासाठी ओळखला जातो. गेल्या काही व्हेरिएंटसारखीच या व्हायरसचीही लक्षणं आहेत. यामध्ये ताप येणं, नाक वाहणं, डोकेदुखी, घशात खवखवणं, पोटदुखी यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. जेएन 1 या सब व्हेरिएंटची लागण झाल्यास पचनासंदर्भातील समस्या अधिक वाढतात.