नवी दिल्ली : इस्रायलमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटमुळं संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. ओमायक्रॉनचा सब व्हॅरिएंट BA1 आणि BA2 यांच्यापासून हा नवा व्हॅरिएंट तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेकडून यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नव्हती. पण, आता मात्र WHO नंही कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात धोका व्यक्त केला आहे. (Corona who )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातही कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत देत येत्या काळात या विषाणूसंदर्भात संपूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


राहिला मुद्दा इस्रायलमधील व्हॅरिएंट खरंच भारतात पोहोचला आहे का या प्रश्नाबाबतचा, तर दिल्लीच्या एम्समधून समोर आलेल्या माहितीनुसार अद्यापही अशा कोणत्याही प्रकरणाची नोंद करण्यात आलेली नाही.


पण, जर हा व्हॅरिएंट इस्रायलमध्येच देशाच्या विविध भागांमध्ये पसरला आणि त्यातही मोठ्या जनसमुदायाच्या रोगप्रतिकारक शक्तीला या व्हॅरिएंटनं शह दिला, तर मात्र कोरोनाचे रुग्ण भारतात झपाट्यानं वाढू शकतात.


सध्या काळजी करण्याचा मुद्दा नसला तरीही, ज्या पद्धतीनं लोक बेजबाबदारपणे वागत आहेत, कोरोनाचे निर्बंध पाळत नाहीत हे पाहता चुकूनही एखादा नवा व्हॅरिएंट भारतात आल्यास मोठा धोका नाकारता येत नाही.


दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेमध्ये असणारा प्रभाव काहीसा कमी होता. परिणामी चौथ्या लाटेपर्यंतही लसींमुळं बळावलेली रोगप्रतिकारक शक्ती या विषाणूशी नव्यानं लढण्याची ताकद देईल असं तज्ज्ञ आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे.


कोरोनाचे सततचे बदलणारे व्हॅरिएंट पाहता येत्या काळात अशा लहानमोठ्या लाटा आणि त्यामागोमाग येणाऱ्या परिणामांसाठी मात्र सर्वांनी तयार राहणं अपेक्षित असेल.