कोरोनाच्या लसीमुळे नपुंसकत्व येणार? लस येताच अफवांचा बाजार
कोरोना लसीसंदर्भात फक्त सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा.
नवी दिल्ली : कोरोना लसीबद्दल वेगवेगळ्या आणि गरमागरम चर्चा बाजारात सुरू झाल्या आहेत. कोरोनाची लस घेतली की नपुंसकत्व येतं. अशीही एक जोरदार अफवा सध्या सुरू आहे. आजपासून लस टोचली जाणार आहे. कोरोनाची लस आली नाही तोच गरमागरम अफवांनी जोर धरला आहे. महत्त्वाचं म्हणजे या अफवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही कानावर गेल्या आहेत. कोरोनाची लस घेतली तर पुरुष आणि महिलांमध्ये नपुंसकत्व येतं, अशी एक जोरदार अफवा पसरली आहे. आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
कोरोनाच्या लसीमुळे नपुसकत्व येतं, ही अफवा उत्तर प्रदेशातून सुरू झाली आहे. कोरोनाची लस घेणार नाही, असं अखिलेश यादव यांनी सांगितलं आहे. त्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते आशुतोष सिन्हांनी म्हटलं की अखिलेश सिंह व्हॅक्सिन घेत नाहीत म्हणजे काहीतरी गडबड आहे. त्यामुळे कोरोना लसीसंदर्भात फक्त सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा.
या अफवांना वैतागून काही डॉक्टरांनी एक ओपन लेटर लिहिलं आहे. त्यामध्ये असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं सांगितलंय. १६ जानेवारीपासून लस टोचायला सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्या टप्प्यात फक्त कोरोनायोद्धे आणि फ्रन्टलाईन वॉरिअर्सनाच लस मिळणार आहे.
भारतात लसीकरण मोहिमेच्या सुरूवातीच्या पहिल्याच दिवशी चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात भारतात 300 दशलक्ष लोकांना कोरोना लस दिली जाईल. 16 जानेवारी 2021 पासून आज भारतात सर्वात मोठा लसीकरण ड्राइव्ह सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी साडेदहा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरण मोहिमेला सुरुवात केली.