भुवनेश्वर : संपू्र्ण देश एकत्र येऊन सध्या कोरोनाशी दोन हात करताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच देशात २१ दिवस लॉकडाऊन जाहीर केले आहे. देशभरात संचारबंदी लागू असून जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरु आहे. सर्वच राज्य आपापल्या परिने या संकटातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करत आहे. ओडिशामध्ये नवीन पटनायक सरकारने कोरोना वायरसशी झुंजणाऱ्या डॉक्टर्स आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना एडव्हान्स पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णांची सेवा करताना या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढणार आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी याची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व नर्स आणि पॅरामेडीकल स्टाफला एप्रिल, मे, जून आणि जुलैचा पगार एकत्र मिळणार आहे. एप्रिलमध्ये चारही महिन्याचा पगार एकत्र मिळेल. संकटाच्या या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जितके करु तितके कमीच आहे. सरकार यांच्यासोबत असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. आरोग्य सुविधा संभाळणाऱ्यांना येणाऱ्या समस्येबद्दल सरकार त्वरीत पाऊले उचलेल असे देखील पटनायक म्हणाले. तसेच २१ दिवसांचा लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन देखील त्यांनी जनतेला केले.



तामिळनाडूत मिळणार बोनस 


तमिळनाडू सरकारने कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेवेतील इतर कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. या कर्मचाऱ्यांना बोसनमध्ये एक महिन्याचा पगार देण्यात येणार आहे.


तमिळानाडूचे मुख्यमंत्री ई.के.पलानीसामी यांनी, डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना बोनससह, रेशनकार्ड धारकांना 1000 रुपये, तांदुळ, साखर आणि इतर आवश्यक वस्तू मोफत देण्याची घोषणा केली आहे.


रेशनच्या दुकानांत गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबात एक टोकन देण्यात येणार. या टोकनच्या आधारे त्यांना रेशन देण्यात येणार आहे.


तमिळनाडूआधी बिहार सरकारनेही, नितिश कुमार यांनी मंगळवारी संकटाच्या काळात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.