सुरत : कोरोना व्हायरसमुळे भारतात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या सुरतमध्ये एका ६९ वर्षांच्या माणसाचं निधन झालं आहे. बडोद्याच्या रुग्णालयातही एका ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे, पण या महिलेचे कोरोनाचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. गुजरातच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे भारतामध्ये झालेला हा ७वा मृत्यू आहे. त्याआधी आज मुंबईमध्ये एका खासगी रुग्णालयात ६३ वर्षांच्या व्यक्तीने प्राण सोडले. या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या रुग्णाला मधूमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असे आजार होते.



तर बिहारमध्येही कोरोनामुळे आजच आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. ३८ वर्षांच्या एका व्यक्तीचं पटनाच्या एम्समध्ये निधन झालं आहे. ही व्यक्ती बिहारच्या मुंगेरमध्ये राहणारी होती. काही दिवसांपूर्वीच हा इसम कतारवरुन परतला होता. 


कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये भारतात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. यानंतर मुंबईत एका पुरुषाला तर दिल्लीत एका महिलेला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. कलबुर्गी, मुंबई आणि दिल्लीत मृत्यू झालेले रुग्ण हे वयोवृद्ध होते.