Corona : नोटा छपाई ३१ मार्चपर्यंत बंद
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
नाशिक : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यातच आता ३१ मार्चपर्यंत नोटा छापण्याचे काम बंद राहणार आहे. नाशिकमधली करन्सी नोट प्रेस ३१ तारखेपर्यंत बंद राहील.
करन्सी नोट प्रेसमधल्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार संघटना आणि महामंडळ मिळून हा निर्णय झाला आहे. ३१ मार्चपर्यंतचे नोटा छापण्याचे लक्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे कोणतीही अडचण नसल्यामुळे व्यवस्थापनाने याला परवानगी दिली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरातली रेल्वेसेवा आधीच ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसंच राज्यातील एसटी बस सेवा, मुंबईतील बेस्ट बस सेवा खासगी बसही बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जमावबंदी लागू केल्यामुळे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
जीवनावश्यक कारणांसाठीच बससेवा सुरु राहणार आहे, तसंच रेल्वेने फक्त मालवाहतुकीला परवानगी दिली आहे. अन्नधान्य, औषधं, भाजीपाला, बँका या कालावधीमध्ये सुरु असणार आहेत. शासकीय कार्यालयामध्येही फक्त ५ टक्के कर्मचारीच काम करणार आहेत.