कोरोना व्हायरसचा बड्या ब्रँडला फटका
कोरोनानं चायनाचं कंबरडं मोडलंय.
मुंबई : चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. भारतातही काही संशयित आढळल्याने घबराट निर्माण झालीयं. केरळमध्ये काही संशयित रुग्ण आढळलेत. त्यामुळे केरळलगत असलेल्या कोकणातील बंदरांत येणाऱ्या बोटींवर आरोग्य खात्यातर्फे खास तपासणी यंत्रणा राबवली जातेय. चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गानं बळी गेलेल्यांची संख्या ७२२वर गेली आहे. आतापर्यंत चीनमध्ये ३४ हजार ५४६जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
मृतांमधील ८१ जण हुबई प्रांत आणि वुहान शहरातील आहेत. तसंच हैनान, हेनान, ग्वांगडाँग, जिलिन प्रांतातही कोरोनानं बळी घेतलेत. १९ विदेशी नागरिकांनाही कोरोनाची बाधा झालीये. कोरोनाबाधीतांवर उपचार करण्यासाठी वूहान शहरात १५०० खाटांचं रुग्णालय उभारण्यात आलंय
कोरोनानं चायनाचं कंबरडं मोडलंय. चीनमध्ये अॅपल फोनची ४२ शो रुम्स बंद आहेत. तर स्टारबक्सचे चार हजारांच्या वर कॅफे बंद पडलेत. कोरोनानं अख्ख्या जागतिक अर्थव्यवस्थेचा बँड वाजवला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटाचा परिणाम आता जगातील तेल बाजारावरही दिसण्याची मोठी शक्यता आहे.
जगातील मोठी तेल उत्पादनं, कोरोनामुळे आपलं उत्पादन कमी करू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कायम ठेवण्याची मागणी लक्षात घेता या आठवड्यात ओपेक आणि त्याच्या सहयोगी संघटनांची बैठक होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या वर्षाभरातील किंमतीच्या तुलनेत, आता सध्या कच्च्या तेलाच्या किंमती सर्वात कमी आहेत. जानेवारी महिन्यापासून कच्च्या तेलाच्या किंमतीत २० टक्क्यांची घसरण झाली आहे.