नवी दिल्ली :   सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. एवढचं नाही तर या धोकादायक व्हायरसमुळे दररोज जवळपास हजारो रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या व्हायरसचा सामना रुग्णाला एकट्याला करावा लागत आहे. परंतु या युद्धामध्ये कोरोना वॉरियर आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करताना दिसत आहे. गेल्या अनके दिवसांपासून डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्य सेवेतील व्यक्तींना कोविड वॉरियर म्हणून ग्राह्य धरलं जात होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करणारा व्यक्ती देखील कोविड वॉरियर आहे, असं म्हणावं लागणार आहे. रुग्णावर अंत्यसंस्कार करणारे आरिफ खान देखील एक कोरोना वॉरियर आहेत. कोरोना रुग्णांची सेवा करत असताना त्यांना देखील कोरोनाची बाधा झाली आणि कोरोना व्हायरसने त्यांचा बळी घेतला. 


आतापर्यंत आरिफ खान यांनी २०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहे.  आरिफ खान हे मागील २५ वर्षांपासून शहीद भगत सिंग सेवा दलासोबत रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत होते. ते कोरोना रुग्णांना मोफत रुग्णवाहिका पुरवण्याचं काम करायचे. शिवाय सेवा दलाच्या माध्यमातून त्यांनी ९० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहे, ज्यांच्या कुटुंबाला देखील क्वारंटाईन करण्यात आले होते. 


त्याचप्रमाणे ज्या कुटुंबाकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते, त्यांना देखील  आरिफ खान यांनी आर्थिक मदत केली आहे. मात्र रुग्णांची सेवा करताना त्यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली. त्याच्यावर दिल्लीतील हिंदू राव रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.