Corona : देशभरात मागच्या २४ तासात कोरोनाचे ५४० नवे रुग्ण
कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे ५,७३४ रुग्ण आढळले आहेत. यातल्या ४७३ जण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात कोरोनाग्रस्तांची संख्या ५४० ने वाढली आहे, तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे १,१३५ रुग्ण आहेत, यातले ११७ रुग्ण बरे झाले आहेत, तर ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
डॉक्टरांच्या १० टीम ९ राज्यांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. काल कोरोनाच्या १३ हजारांपेक्षा जास्त टेस्ट झाल्या. तर आतापर्यंत १,३०,००० टेस्ट झाल्या, यातल्या ५,७३४ टेस्ट पॉझिटिव्ह आल्या, आयसीएमआरने सांगितलं आहे.
पीपीई, मास्क आणि व्हॅन्टिलेटरचा पुरवठा केला जात आहे. देशातल्या २० उत्पादकांना पीपीई तयार करायला सांगण्यात आलं आहे. पीपीईसाठी १.७० कोटी ऑर्डर देण्यात आल्या आहेत आणि याचा पुरवठा सुरु झाला आहे. ४९ हजार व्हॅन्टिलेटरचीही ऑर्डर देण्यात आली आहे.
२,५०० पेक्षा जास्त डॉक्टर आणि ३५ हजार पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना रेल्वेने तैनात केलं आहे. कोरोनाशी लढण्यासाठी ५८६ हेल्थ युनिट्सची चेन ४५ सब डिव्हिजनल रुग्णालय, ५६ डिव्हिजनल रुग्णालय, ८ प्रॉडक्शन युनिट रुग्णालय आणि १६ झोनल हॉस्पिटल महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. तसंच कोरोनासाठी खास रुग्णालय तयार करण्यावरही चर्चा झाल्याचं लव अग्रवाल म्हणाले.
देशात पीपीई किट्सची कोणतीही कमी नाही, याचा वापर धोका ओळखून केला जात आहे, सगळ्यांना या पीपीई किट्सची गरज नाही, असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.