देशात कोरोनाचे ४०६७ रुग्ण; आतापर्यंत १०९ लोकांचा मृत्यू
291 रुग्ण कोरोनामधून बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढतोच आहे. आता देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 4067वर पोहचली आहे. 1445 लोक तबलीगी जमातशी जोडलेले आहेत. देशात कोरोनाचे 693 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 109 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 291 लोक कोरोनामधून पूर्णपणे बरे झाले आहेत, आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी यााबाबत माहिती दिली आहे.
लव अग्रवाल यांनी संशयित प्रकरणांमध्ये मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असल्याचं सांगितलं आहे. राज्यांना आज 3000 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत आलेल्या एकूण प्रकरणांच्या विश्लेषणानंतर 24 टक्के प्रकरणं ही महिलांमधील असल्याचं समोर आलं आहे.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, काऊंसिल ऑफ मिनिस्टर्सच्या बैठकीत प्लान ऑफ ऍक्शनवर चर्चा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान जनतेसाठी व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. ज्यात लोकांना तोंड, चेहरा कव्हर करण्यााबाबत सांगण्यात आलं आहे. लोकांना अधिकाधिक सावधगिरी बाळगण्याचं सांगण्यात आलं आहे.
तबलीगी जमात प्रकरणी संपर्कात आलेल्या आतापर्यंत जवळपास 25500 लोकांना क्वारंटाईन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
5 लाख टेस्टिंग किटची ऑर्डर देण्यात आली असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.