देशात गेल्या २४ तासांत ९०५ नवे कोरोना रुग्ण
आतापर्यंत 980 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढते आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशभरात आता कोरोनाबाधितांची संख्या 9352वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 324 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 51 लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत 905 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
तर आतापर्यंत 980 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोविड-19 विरोधात लढण्यासाठी 5 हजार लोकांनी वेन्टिलेटर्सच्या रुपात योगदान दिलं आहे. आतापर्यंत 30 हजार कोटी लोकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. देशात कोरोना टेस्ट किटची कमी नसल्याचं आरोग्य मंत्रालयचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.
कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असली तरी या सगळ्यात एक दिलासादायक बाबही समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील 15 राज्यातील 25 जिल्हे जेथे कोरोनाचा संसर्ग होत होता, तिथे गेल्या 14 दिवसांत एकही नव्या संसर्गाचं प्रकरणं समोर आलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. या जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा फैलाव कमी झाला किंवा जवळपास थांबला आहे. ही देशासाठी सर्वात दिलासादायक बाब ठरत आहे.
देशभरात कोरोनासाठीची टेस्टिंग क्षमताही वाढण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.