कोरोनामुळे दिल्लीच्या सीमा बंद, अनेक कामगार अडकलेत
कोरोनामुळे दिल्लीच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे अनेक कामगार अडकून पडले आहेत.
नवी दिल्ली : कोरोनामुळे दिल्लीच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे रोजगारासाठी शहरात आलेले कामगार अडकून पडले आहेत. कडाऊनमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे कामगारांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊननंतर राजधानी दिल्लीच्या सीमा बंद केल्यामुळे दिल्लीत येणाऱ्या किंवा दिल्लीतून बाहेर जाणाऱ्यांना सीमेवर रोखण्यात येत आहे. केवळ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांचे ओळखपत्र तपासून त्यांना सोडण्यात येत आहे.
दिल्लीत वादळी पाऊस
दरम्यान, दिल्लीमध्ये सकाळच्या सुमारास वादळीवाऱ्यासह पावसानं हजेरी लावलीय. यावेळी शहरातील सखल भागात पाणी साचलंय. पाऊस झाल्यानंतर शहरातील तापमान कमी झालं असून, गारवा निर्माण झाला होता. दरम्यान येत्या काळात शहरात गारांचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
वर्दीतल्या देवाचे दर्शन घडले
कोरोनामुळे वर्दीतल्या देवाचं दर्शन घडले आहे. दिल्ली लॉकडाऊन करण्यात आलीय. त्यामुळे हातावर पोट भरणारे, कामगार, लॉकडाऊनमुळे अडकलेले यांच्यासाठी दिल्ली पोलिसांकडून जेवणाचं वाटप करण्यात आलंय. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करत नागरिकांनी रांग लावून जेवण घेतले आहे.
सोशल डिस्टसिंगचे पालन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी जुम्म्याची नमाज घरीच अदा केली. लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी सोशल डिस्टसिंगचं पालन करत घरीच नमाज अदा केलीय.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतेय
तर दुसरीकडे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७२९ वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. यात ४७ परदेशी नागरिक आहेत. आत्तापर्यंत कोविड-१९ या आजाराची लागण झालेले ७१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर या आजारानं १७ जण दगावले आहेत. दरम्यान देशभरात २७ हजारांहून अधिक संशयित कोरोनाबाधित रुग्णांपैकी २६ हजार ७९८ जणांच्या नमून्यांची चाचणी झाली असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.