नवी दिल्ली :  भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या सोमवारी आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली. देशभरात २४ तासांत ८३९२ रुग्णांची नोंद झाली असून देशात आतापर्यंत कोरोनाचे ५३९४ बळी गेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात कोरोना रुग्णांची संख्या आता १ लाख ९० हजार ५०० हून अधिक झाली आहे. देशात बरे न झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ९३ हजार ३२२ इतकी आहे. तर ९१८१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे ५३९४ जणांचा मृत्यू झाला आहे.


एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण भारतात वाढत असून ते ४८.१८ इतकं झालं आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक ६७ हजार ६५५ रुग्ण असून महाराष्ट्रासह चार राज्यांत १० हजारांवर रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे २२८६ बळी गेले आहेत. महाराष्ट्रात २९ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.


तामिळनाडूत २२ हजार ३३३ रुग्ण असून १७३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत १९८४४ कोरोना रुग्ण असून ४७३ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये कोरोनाचे १६७७९ रुग्ण असून १ हजार ३८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


केंद्र सरकारने लॉकडाऊन तीन टप्प्यांत उठवण्याची घोषणा केल्यानंतर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम जाणवलेल्या राज्यांसह देशभरात लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी अनेक राज्यांनी त्यांची नियमावली जाहीर केली आहे.



अनेक राज्यांत सोमवारपासून सार्वजनिक वाहतूक सुरु केली असली तरी काही राज्यांत अजूनही याबाबत निर्णय घेतलेला नाही. हॉटेल आणि रेस्टॉरंटबाबतही अनेक राज्यांनी सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही. दिल्ली, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांनी अजून नियमावली जाहीर केलेली नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी नियमावली जाहीर केली. कंटेनमेंट झोन वगळता राज्यात लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी जाहीर केला.