Coronavirus ची तिसरी लाट सुरु; मुंबई- दिल्लीत समूह संसर्गाची सुरुवात
Corona रुग्णांचे आकडे मोठ्या पटीनं वाढत चालले आहेत
नवी दिल्ली : संपूर्ण जगासह आता भारतातही कोरोनानं पुन्हा एकदा (Coronavirus) रौद्र रुप दाखवण्यास सुरुवात केली आहे. दर दिवसागणिक कोरोना रुग्णांचे आकडे मोठ्या पटीनं वाढत चालले आहेत. त्यातच कोरोनाच्या नव्या, ओमायक्रॉन या (Covid-19 Omicron Variant) व्हॅरिएंटचा संसर्ग अतिशय झपाट्यानं होऊ लागला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात मागील 24 तासांमध्ये 13154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.
ज्यामुळं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यातून देशाचं एक पाऊल पुढे आलं आहे हे स्पष्ट झालं.
मुंबई, दिल्ली आणि बिहारमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. दिल्लीत या विषाणूच्या संसर्गानं धोक्याची पातळी ओलांडल्याचं कळत आहे.
दिल्लीचे आरोग्यमत्री सत्येंद्र जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार इथं समूह संसर्ग अर्थात कम्युनिटी ट्रान्समिशनची Omicron Community Transmission) सुरुवात झाली आहे.
सध्या दिल्लीमध्ये प्राथमिक स्वरुपात काही नियम लागू करण्यात आले आहेत.
परिस्थिती अधिकच बिघडल्यास नियम आणखी कठोर केले जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
प्रवास न केलेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण
दिल्लीत सध्याच्या घडीला कोरोनाग्रस्तांमधील 46 टक्के रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. ज्यामुळं हा व्हॅरिएंट दिल्लीत पसरल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई कोरोनाच्या निशाण्यावर...
बुधवारी मुंबईत कोरोनाचे 2500 हून अधिक नवे रुग्ण आढळले. जवळपास आठ महिन्यांनंतर शहरात इतकी मोठी रुग्णसंख्या आढळली होती.
नव्या संसर्गामध्ये ओमायक्रॉनची लागण 80 टक्क्यानं निरीक्षणात आली आहे. ज्यामुळं इथंही समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
बिहारमध्येही परिस्थिती वेगळी नाही. देशातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी सध्या कोरोनाबाबत अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे.
परिस्थिती अशीच बिघडत राहिल्यास देशातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा मोठ्या आव्हानाला तोंड देईल ही बाब नाकारता येत नाही.