मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक राज्यांच आणि मागोमाग संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. ज्यानंतर या एका घोषणेनंतर सर्वांच्याच आयुष्यात आणि दिनचर्येत काही महत्त्वाचे बदल घडून आले. सानथोरांपासून सर्वांपुढे हे एक आव्हानच. पण, कोरोनावर मात करण्यासाठी या आव्हानालाही सामोरं जाण्याची तयारी सर्वांनी दाखवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याची तणावाची परिस्थिती त्याचा आपल्यावर शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिणाम होणं स्वाभाविक आहे. अगदी लहान मुलंही याला अपवाद नाहीत. याच धर्तीवर राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य संस्था आणि न्युरो- सायन्स हॉस्पिटल  (NIMHANS) यांच्याकडून काही महत्त्वाचे सल्ले देण्यात आले आहेत. ज्याअंतर्गत होम क्वारंटाईन आणि लॉकडाऊनच्या काळात लहान मुलांचं मानसिक स्वास्थ्य कसं जपावं याविषयीसुद्धा सांगण्यात आलं आहे. 


मुलांना कोणत्याही गोष्टीसाठी विश्वासात घ्या... 


मुलांना कोणतेही प्रश्न असतील, त्यांना काही शंका असतील तर त्यांचं निरसन करा. त्यांना विश्वासात घ्या. त्यांच्यासमवेत अधिकाधिक वेळ व्यतीत करा. गोष्टी वाचणं, सांगणं याचा इथे उपयोग होऊ शकेल. 


मित्रमंडळींच्या संपर्कात ठेवा...


मित्रांपासून इतक्या मोठ्या काळासाठी दुरावलं जाणं मुलांसाठी चिंतेची बाब असू शकते. त्यामुळे नव्या सुविधांचा वापर करत त्यांना व्हिडिओकॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात ठेवा. भावंडांसोबत संवाद साधण्यास त्यांना प्रोत्साहन द्या. 


बदलता स्वभाव सांभाळा... 


लॉकडाऊनच्या काळात सतत होणआरी चिडचीड, स्वभावात येणारे बदर हे स्वाभाविक आहेत. त्यामुळे ते अतिशय संवेदनशीलपणे हाताळा. त्याच्याशी चढ्या आवाजात बोलण्याऐवजी ते काय म्हणत आहेत हे सर्वप्रथम ऐकून घ्या. 


 


परिस्थितीविषयी त्यांना सजग करा... 


कोरोना व्हायरसच्या महामारीविषयी लहान मुलांवर वारंवार बातम्या, माहितीचा भडीमार करु नका. पण, त्यांना परिस्थितीची जाणीव मात्र असूद्या. सध्याचा प्रसंग हा अतिशय सकारात्मकतेने आणि तितक्याच विश्वासाने हाताळा. 


घरातच राहून मनमुराद खेळा... 


विस्मरणात गेलेल्या बैठ्या आणि घरगुती खेळांना पुन्हा सुरुवात करा. कोडं, चिठ्ठ्यांचे खेळ सोबतच योगाभ्यास अशा अनेक मार्गांनी बच्चेकंपनीला मग्न ठेवा. 


आणि मदत लागलीच तर.... 


परिस्थिती हाताबाहेरची असून तुम्हाला कोणाची मदत लागलीच तर, COVID 49 Psycho social च्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. 


दूरध्वनी क्रमांक आहे : 080-46110007