मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत आहे. महाराष्ट्रासह पाच राज्यात कोरोना रुग्णवाढ वेगानं होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झालं असून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र पाठवून अलर्ट केलं आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहून कोरोना रोखण्यासाठी वेळीच पावलं उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मिझोरम या पाच राज्यांत कोविड पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. त्यासह रुग्णसंख्येतही मोठी वाढ दिसत आहे. याबाबत पत्रात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 


वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात यावीत. स्थितीवर बारीक लक्ष ठेवावं आणि कोविड विषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जावे, अशी सूचना या पत्रात करण्यात आली आहे.


आयपीएलमध्येही कोरोना


दिल्ली कॅपिटल्सच्या 5 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता या संघाच्या आजच्या सामन्याचं स्थळ बदलण्यात आलं आहे. आता हा सामना मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. दिल्लीची आज पंजाब संघाविरोधात मॅच होणार आहे. ती आधी पुण्याला होणार होती. मात्र संघातील फिजिओसह पाचजणांना कोरोनाची लागण झाल्यानं प्रवास टाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


चीनमध्येही संसर्गात वाढ


चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार झाला आहे. शांघाई शहरात कोरोना नियंत्रणाबाहेर असल्याच चित्र आहे. चीनमध्ये गेल्या 24 तासांत 21 हजार 400 नवे रुग्ण आढळले. कोरोनानं मृत्यू होण्याची संख्याही वाढली आहे.