नवी दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) जगभरात चिंता वाढवली आहे.  जगभरातील 17 देशांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात प्रथम दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ओमायक्रॉन विषाणू आढळला. जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) ओमायक्रॉन विषाणूविषयी चिंता व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात ओमायक्रॉनचे किती रुग्ण?
भारतात या विषाणूचे किती रुग्ण आहेत असा प्रश्न विचारल जात आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी देशवासियांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या सत्रात बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं की देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तसंच हा विषाणू देशात शिरकाव करु नये यासाठी संभाव्य काळजी घेतली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.


गेल्या दीड वर्षात कोरोना संकटात आपण अनेक गोष्टी शिकलो, आपण कोणत्याही परिस्थितीचा सामना करु शकतो असंही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


केंद्राची सहाकलमी योजना
ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता केंद्राने उपाययोजना सुरु केल्या आहेत. केंद्रातर्फे  राज्य सरकारशी समन्वय साधला जात आहे. ओमायक्रॉनचा धोका रोखण्यासाठी केंद्राने सर्व राज्यांना सहा कलमी उपाययोजना सांगितल्या आहेत. राज्याने या उपाययोजनांचा अवलंब केल्यास ओमायक्रॉनचा धोका लवकर कळेल आणि त्याला सामोरे जाणे सोपे होईल. 


- केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना चाचण्या वाढवण्यास सांगितलं आहे,  जेणेकरुन वेळीच रुग्णांचा शोध लागेल आणि त्यांच्यावर उपचार करणं सोप होईल. 


- केंद्राने राज्यांना कंटेनमेंट झोन तयार करण्यास सांगितले आहे.


-  राज्यांना सर्व स्तरांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.


- हॉटस्पॉट क्षेत्रांवर लक्ष ठेऊन उपाययोजना आखण्यास सांगण्यात आलं आहे.


- सर्व राज्यात लसीकरणाची व्याप्ती वाढवावी


- आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत कराव्यात


केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, ओमायक्रॉन प्रकार RT-PCR आणि RAT चाचण्यांद्वारे ओळखला जाऊ शकतो. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पुरेशा पायाभूत सुविधा तयार कराव्यात तसंच होम आयसोलेशनवर विशेष लक्ष ठेवावं असंही राजेश भूषण यांनी म्हटलं आहे.