पाण्याच्या वादावरुन गोळीबार, नगरसेवकाच्या भावाची गोळी झाडून हत्या
...
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत पाण्यावरुन गदारोळ माजला आहे आणि याच गदारोळात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. दिल्लीतील संगम विहार परिसरात पाण्याच्या कनेक्शनवरुन झालेला वाद इतका टोकाला पोहोचला की, नगरसेवकाच्या भावाची गोळी झाडून हत्या करण्यात आली.
ही घटना १४ जून रोजी संध्याकाळी घडली आहे. मृतक किशन भडाना याच्या पत्नीने झी न्यूजला सांगितले की, त्यांच्याकडे पाण्याचे दोन कनेक्शन आहेत. तसेच तिसरं कनेक्शन घ्यावं यासाठी किशन भडाना याचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी बाजुच्या गल्लीतील पाईप लाईनने कनेक्शन घेण्यात येत होतं. मात्र, शेजारी राहणाऱ्या बबलीने त्याला विरोध केला.
यानंतर किशन भडाना आणि बबली यांच्यात जोरदार वाद झाला. वाद इतका वाढला की दोन्ही पक्षांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत मृतक किशनच्या पत्नीला दुखापत झाली तसेच आरोपी बबलीही जखमी झाला.
प्रकरण शांत झाल्यावर किशन भडाना आपल्या घरी पोहोचला त्याच दरम्यान बबलीने किशन आणि त्याचा मुलगा मनीष याच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात किशन भडाना हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारा दरम्यान १५ जून रोजी त्याचा मृत्यू झाला.
दक्षिण दिल्लीचे अॅडिशनल डीसीपी विजयन्ता आर्या यांनी सांगितले की, मृतक किशन भडाना हा भाजप नगरसेवक सुभाष भडाना याचा लहान भाऊ आहे. किशन भडाना याला दोन मुलं आणि एक मुलगी आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे ज्यामध्ये मुख्य आरोपी बबली, कन्नू, गगन आणि रामपाल यांचा समावेश आहे. तसेच पोलीस सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.