राजस्थान: निर्वस्त्र करुन प्रेमी युगुलाची काढली धिंड
या घटनेनंतर पीडित महिला व तिचा प्रियकर दोघांना मोठा धक्का बसला आहे.
जयपूर: देशभरात हिंसक जमावाकडून हत्यांचे सत्र सुरु असतानाच राजस्थानमध्ये एका प्रेमी युगुलाला मारहाण करुन त्यांची गावभर धिंड काढण्याची आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका स्थानिक गावकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खुर्द येथे राहणाऱ्या एका महिलेचे गावातील पुरुषाशीच लग्न झाले होते. काही कारणांमुळे दोघेजण पाच वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. यानंतर या महिलेने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले. मात्र, त्यांचे लग्नही फारकाळ टिकले नाही. यानंतर गेल्या आठवड्यात ही महिला तिसऱ्याच पुरूषाच्या घरी राहायला गेली. ही गोष्ट समजल्यानंतर महिलेच्या पहिल्या पतीला राग आला. आपल्या नातेवाईकांसह तो महिलेच्या घरी पोहोचला आणि महिला व तिच्या प्रियकराला मारहाण केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. या सर्वांनी महिला व तिच्या प्रियकराला निर्वस्त्र करून गावभर त्यांची धिंड काढली. त्यांनी या घटनेचे चित्रण करून ते सोशल मीडियावर व्हायरलही केले. सर्व गावकरी हा तमाशा बघत राहिले. कोणीही महिला आणि तिच्या प्रियकराला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. या घटनेनंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. महिलेचा पहिला पती अजून फरार आहे. या घटनेनंतर पीडित महिला व तिचा प्रियकर दोघांना मोठा धक्का बसला आहे. या दोघांचे सध्या समुपदेशन करण्यात येत आहे.