अनैतिक संबंधांना नैतिक ठरवणाऱ्यांना कोर्टाचा दणका
लिव्ह इन रिलेशनशीपची निश्चित अशी व्याख्या नाही.
अमर काणे, नागपूर : लिव्ह इन रिलेशनशीपची निश्चित अशी व्याख्या नाही. त्यामुळं जो जमेल तसं आपल्या नातेसंबंधांना लिव्ह इनच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा लोकांना अलाहाबाद हायकोर्टानं दणका दिला आहे.
लग्न न करता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. काही जण घटस्फोट न घेता दुसऱ्या जोडीदारासोबत राहत आहेत. त्यालाही लिव्ह इनचं गोंडस नाव दिलं जातं. यूपीतल्या एक महिला घटस्फोट न घेता दुसऱ्य़ा जोडीदारासोबत राहत होती. या नात्याला लिव्ह इन रिलेशनशिप अशी मान्यता मिळावी म्हणून तिनं अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टानं ही याचिका फेटाळली. शिवाय घटस्फोट न घेता परपुरुषासोबत राहणं हा गुन्हा असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. ज्यांचं वैवाहिक आयुष्य नाही अशांनाच लिव्ह इनमध्ये राहता येईल असंही कोर्ट म्हणालं आहे.
'लिव्ह इन रिलेशनशिप' समाजाच्यादृष्टीने अनैतिक असू शकते. मात्र बेकायदा नाही. हे संबंध विवाहसदृश असावेत अशी कोर्टाची भूमिका आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळं लिव्ह इन मधील कायदेशीर गुंतागुंत थोडीशी कमी झाली आहे.