मिरपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर POK मधील गरीब नागरिकांना वाटण्यासाठी देण्यात आलेले साहित्य पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी परस्पर विकल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. POKच्या मीरपूर येथील नागरिकांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. यापैकी एका नागरिकाने सांगितले की, आम्ही अन्नधान्य मागायला गेल्यानंतर आम्हाला दुकानावर दोन-दोन तास थांबायला लावतात. या सगळ्याविरुद्ध तहसील कार्यालयात तक्रार केली तर त्यांनीही आम्हाला ताटकळत ठेवले. यानंतर जवळच्या दुकानात अन्नधान्य पुरवणारा ट्रक येऊन गेल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. मात्र, आम्ही चौकशी केली असता दुकानात ट्रक आलाच नसल्याचे दुकानदाराने सांगितले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्यानंतर आम्ही पुन्हा तहसील कार्यालयात गेलो तर आमचे मोबाईल नंबर घेण्यात आले. अन्नधान्याची गाडी आल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अनेक दिवस उलटूनही तहसील कार्यालयातून फोन आला नाही. तर रेशनच्या दुकानांवरही पीठ मिळत नाही. सतत काही ना काही कारण देऊन रेशन दुकानदार सामान देण्यास टाळाटाळ करत आहेत. 


'कारखाने सुरु करा अन्यथा चीन आपली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बळकावेल'

सरकारने या संकटाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशभरात सर्वत्र जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा साठा पाठवला आहे. मग या सगळ्या वस्तू गरिबांपर्यंत का पोहोचत नाहीत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील सरकारी अधिकाऱ्यांकडूनच या वस्तू बाजारपेठेत विकल्या जात असल्याची शंका अनेकांना वाटत आहे. 

कालच पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सरकारी मदतीचे वाटप करताना हिंदू आणि ख्रिश्चन समूदायाच्या लोकांशी दुजाभाव होत असल्याचा प्रकार समोर आला होता. कोरोना ही संपूर्ण जगावर आलेली आपत्ती आहे. अशावेळी हिंदू किंवा मुस्लिम असा भेद करून चालणार नाही. मात्र, सिंध प्रांतात हिंदू आणि ख्रिश्चनांना कोणीही सहकार्य करायला तयार नाही, अशी व्यथा येथील नागरिकांनी मांडली होती.