Covid 19: देशात पुन्हा एकदा कोरोना (Coronavirus) थैमान घालणार का अशी भीती निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे गुरुवारी देशभरात एका दिवसात तब्बल 6050 रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 13 टक्के इतकी आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य मंत्रालयाने याआधीच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर मास्कसक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 30 हजार 943 वर पोहोचली आहे. दरम्यान आतापर्यंत एकूण 4 कोटी 47 लाख 85 हजार 858 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, डिस्चार्च देण्यात आला आहे. 


देशात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने परिस्थिती गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 3.39 इतका असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3.02 टक्के आहे. 



आदल्या दिवशी देशात 1 लाख 78 हजार 533 चाचण्या करण्यात आल्या होत्या. तसंच गेल्या 24 तासात लसीचे 2334 डोस देण्यात आले आहेत. 16 जानेवारी 2021 पासून देशात लसीकरणाला सुरुवात झालेली असून आतापर्यंत संपूर्ण देशभरात 2 अब्जाहून अधिक लसीचे डोस देणयात आले आहेत. 


महाराष्ट्रातही स्थिती गंभीर


गुरुवारी महाराष्ट्रात 803 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच राज्यात 3 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यदूर 1.82 टक्के इतका आहे. 


दरम्यान मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोविडमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी कोविडमुळे एकाचा झाला होता मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबईत गुरुवारी 216 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मुंबईत सध्या 1 हजार 268 रुग कोरोनाबाधित आहेत. 


साताऱ्यात मास्कसक्ती


सातारा जिल्ह्यातही करोना रुग्णांचं प्रमाण वाढू लागलं आहे. साताऱ्यात आतापर्यंत 45 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच सोमवारी दोन रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली. यानंतर साताऱ्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.