Government eases travel norms for passengers: देशामधील करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने चीनसह अन्य सहा देशांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नियम शिथील केले आहेत. दरम्यान भारतात येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची Random Testing मात्र सुरु राहणार आहे. आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीचे नियम शिथील करत चीन (China), जपान (Japan), सिंगापूर (Singapore), दक्षिण कोरिया (South Korea), थायलँड (Thailand) आणि हाँगकााँग (Hong Kong) येथून येणाऱ्यांसाठी असणारे नियम हटवले आहेत. याआधी प्रवाशांना करोना चाचणी प्रमाणपत्र सादर करावं लागत होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य मंत्रालयाने नागरी उड्डाण मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. यात सांगण्यात आलं आहे की, गेल्या चार आठवड्यांपासून या देशांमध्ये करोनासंबंधित रुग्णसंख्येत सातत्याने आणि लक्षणीय घट होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २८ दिवसांत जागतिक स्तरावर नवे रुग्ण सापडण्याच्या केसेसमध्ये ८९ टक्क्यांची घट दिसून आली आहे.


पत्रात सांगण्यात आलं आहे की, 'भारतात करोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे, दररोज 100 पेक्षा कमी नवीन रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे मंत्रालय आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियमात बदल करत आहे. चीन, सिंगापूर, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपानमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियम शिथील करण्यात येत आहेत.


आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात म्हटले आहे की, 'भारतात येणाऱ्या 2 टक्के प्रवाशांची रँडम चाचणी मात्र कायम असणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये SARS-CoV-2 च्या उत्परिवर्तित प्रकारांमुळे होणाऱ्या संसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी ही चाचणी सुरू राहील'. 13 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजल्यापासून नवी नियमावली लागू होणार आहे.