Corona | कोरोनाचा अवघ्या 48 तासात खात्मा, या कंपनीचा दावा
कोरोनाने (Corona Virus) गेल्या 2 वर्षांपेक्षा अधिक काळापासून संपूर्ण जगाच्याच नाकी नऊ आणले.
मुंबई : कोरोनाने गेल्या 2 वर्षांपेक्षा अधिक काळापासून संपूर्ण जगाच्याच नाकी नऊ आणले. कोरोनामुळे संपूर्ण जगात नको असलेली पॉझिटिव्हीटी पसरली. मात्र आता संपूर्ण जग कोरोनातून सावरतोय. दरम्यान आता संपूर्ण भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने पॉझिटिव्ह आणि कोरोनासाठी नेगिटव्ह बातमी आहे. कोरोनावर मात करण्यासाठी नाकावाटे देण्यात येणारा स्प्रे (Coronavirus Nasal Spray) लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, नाकावाटे औषध घेतल्याच्या 48 तासांनंतर कोरोनाचा नायनाट होईल. (covid 19 nasal spray launched in India will eliminate corona in just 48 hours know details)
ग्लेनमार्क फार्माने कॅनेडाच्या बायोटेक फर्म SanNotize सोबत हा नेजल स्प्रे लॉन्च केला आहे. फॅबीस्प्रे (Fabispray)असं या स्प्रेचं नाव आहे. नाकावाटे देण्यात येणारं हे औषध Niteic Oxide यावर आधारित आहे.
कोरोनाचा 48 तासात नायनाट
या स्प्रेचा वापर हा 18 वर्षांवरील रुग्णांना करता येईल. कंपनीने हा स्प्रे लॉन्च करण्याआधी देशातील 20 रुग्णालयातील 306 रुग्णांवर याची चाचणी करुन पाहिली. कंपनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात 24 तासांमध्येच कोरोनाचा प्रभाव 94 टक्क्यांनी कमी होतो. तर 48 तासात कोरोनाचा 99 टक्के नायनाट होतो.
गळ्यातच कोरोनाचा खात्मा
दरम्यान, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने तो गळ्यातच नाहीसा होतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग हा फुप्फुसांपर्यंत पोहचत नाही. कंपनीच्या दाव्यानुसार, यूएसएत केलेल्या अभ्यासानुसार, हा स्प्रे कोरोनाच्या अल्फा, बिटा, गामा, डेल्टा, आणि इप्सलिन व्हेरिएंटचा 2 मिनिटात नायनाट करु शकतो.